ताज्या घडामोडी

*कसनसूर फळ रोपवाटिका बनणार आदर्श केंद्र – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचा आढावा*

*दुर्गम भागातही फळबाग हब साकारण्याचा प्रयत्न, जिल्हा प्रशासनाचा पुढाकार*

गडचिरोली, दि. १७ जुलै (जिमाका) :
गडचिरोली जिल्ह्याची ओळख आता केवळ खनिजसंपत्तीच्या उत्खननामुळे निर्माण झालेल्या ‘स्टील हब’ म्हणून मर्यादित राहत नसून, पर्यावरणपूरक व शाश्वत शेतीला चालना देणाऱ्या ‘फळबाग हब’च्या दिशेनेही वाटचाल सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर एटापल्ली तालुक्यातील अति दुर्गम कसनसूर येथील 10 हेक्टर क्षेत्रावर उभारलेल्या शासकीय फळ रोपवाटिकेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सौ. प्रीती हिरळकर यांनी नुकतेच भेट देऊन सविस्तर आढावा घेतला.

गेल्या तीन वर्षांपासून काजू, आंबा, चिकू, पेरू, सिताफळ, चिंच आदी फळपिकांची कलमांद्वारे रोपे तयार करण्याचा उपक्रम या रोपवाटिकेत यशस्वीरित्या राबविला जात आहे. विशेष म्हणजे, काजू व कोको संचालनालय केरळ यांच्या सहकार्याने कृषी विभागामार्फत एटापल्ली, अहेरी, भामरागड आणि सिरोंचा तालुक्यांमध्ये 608 हेक्टर क्षेत्रावर काजू लागवडीचा विस्तार करण्यात आला आहे.

अहेरी उपविभागातील हवामान हे कोकणासारखे उष्ण व दमट असून, फळबाग लागवडीसाठी अनुकूल आहे. मात्र दुर्गम भागात दळणवळणाची साधने व कम्युनिकेशन सुविधांचा अभाव असल्याने येथील शेतकरी मुख्यतः भातपिकावर अवलंबून होते. आता मात्र कृषी विभागाच्या प्रयत्नांमुळे शेतकरी विविध फळबाग पिके तसेच बांधावरील नाचणी, तुर, तीळ व कापसासारख्या पिकांकडे वळताना दिसत आहेत. फळबाग लागवडीमुळे कार्बन क्रेडिटचा लाभ घेण्याचीही संधी असून, त्यामुळे उद्योग आणि शेती यांचा समन्वय साधून समतोल विकास घडवून आणता येणार आहे.

कसनसूर रोपवाटिकेत तीन वर्षांपूर्वी वेंगुर्ला-4, 7 व 9 या काजूच्या जातींची मातृवृक्ष बाग उभारण्यात आली असून, लवकरच केशर आंब्याची मातृवृक्ष बागही विकसित होणार आहे. त्यामुळे भविष्यात गडचिरोली जिल्हा ‘काजू-आंबा-चिकू हब’ म्हणून ओळखला जाण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिरळकर यांनी रोपवाटिकेच्या संपूर्ण परिसराची पाहणी करून भविष्यातील विकासासाठी आवश्यक बाबींचा समावेश असलेला आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. या आराखड्यात कुंपण, प्रशिक्षण केंद्राची दुरुस्ती, शेडनेट, प्लास्टिक टनेल, सौरऊर्जेवर आधारित वीज निर्मिती युनिट आदींचा समावेश करून रोपवाटिकेला आदर्श बनवण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button