*आदिवासी उमेदवारांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण*
गडचिरोली, दि. २७ (जिमाका) : जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांच्या वतीने मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), जिल्हा निवड समिती, IBPS (बँकिंग) व SSC (कर्मचारी निवड आयोग) परीक्षांसाठी सविस्तर मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांकडे शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र तसेच रोजगार नोंदणी कार्ड असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महिने (३.५ महिने) असून, प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना दरमहा रु. १०००/- विद्यावेतन देण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना चार अभ्यासपुस्तकांचा संच आणि अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज १ जुलै २०२५ ते २८ जुलै २०२५ या कालावधीत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली येथे सादर करावेत.
यासंदर्भातील मुलाखत दिनांक २९ जुलै २०२५ रोजी शासकीय संकुल, बॅरेक क्र. २, गडचिरोली येथील मार्गदर्शन केंद्रात आयोजित करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी निर्धारित दिवशी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी मो. क्र. ८४८५८१४४८८ वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी योगेंद्र शेंडे यांनी केले आहे.
—000—