*गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामातील कृषी मोहिमांचा यशस्वी टप्पा : ४५४२ मोहिमा तीन महिन्यात पूर्ण*
गडचिरोली, ३ जुलै : खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध कृषी मोहिमांना मोठे यश मिळाले आहे. एप्रिल ते जून २०२५ या कालावधीत जिल्ह्यात ४७६३ कृषी मोहिमांचे नियोजन करण्यात आले होते, यापैकी ४५४२ मोहिमा एप्रिल ते जून या तीन महिन्याउ यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या असून सर्व मोहिमांची नोंद ‘महाकृषी’ या शासकीय ॲपवर करण्यात आली आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी सांगितले की, उर्वरित मोहिमा लवकरच पूर्ण करण्यात येणार असून, या मोहिमांमुळे जिल्ह्यात शेतीत सकारात्मक बदल घडण्यास मदत होत आहे.
*मोहिमांचा उद्देश व स्वरूप*
या मोहिमांचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करणे व विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणे हा होता. मोहिमांमध्ये खालील घटकांचा समावेश होता:
पिकनिहाय प्रशिक्षण व आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक
खत व माती आरोग्य व्यवस्थापनाचे मार्गदर्शन
बीज प्रक्रिया व साठवणूक तंत्र
कीड व रोग व्यवस्थापनाचे सखोल प्रशिक्षण
प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेबाबत माहिती व मार्गदर्शन
कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक आणि तालुका कृषी अधिकारी यांनी गावोगावी जाऊन मोहिमा राबविल्या. शिवार फेऱ्यांमधून प्रत्यक्ष प्रात्यक्षिके देण्यात आली, ज्यामुळे शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची सोपी व प्रत्यक्ष माहिती मिळाली.
*आधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांची वाटचाल*
या यशस्वी मोहिमांमुळे शेतकऱ्यांमध्ये कृषीविषयक सजगता वाढली असून, आधुनिक शेती पद्धतीकडे कल वाढत आहे. उत्पादनात वाढ होण्याची शक्यता अधिक असून, विभागीय पातळीवरून या उपक्रमांचे सकारात्मक मूल्यमापन करण्यात येत आहे.
जिल्हा कृषी विभागाच्या नियोजनबद्ध व तळागाळापर्यंत पोहोचणाऱ्या कामगिरीमुळे खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये गडचिरोली जिल्हा उत्पादनक्षमता, तांत्रिक प्रगतता आणि योजनेचा लाभ मिळवणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ अनुभवणार असल्याचा विश्वास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी व्यक्त केला आहे.