*गडचिरोली शहरानजीक दोन हत्तींचा वावर; नागरिकांनी दक्षता बाळगावी – वनविभागाचे आवाहन*

*सेल्फीसाठी हत्तींचा पाठलाग करू नका*
गडचिरोली, दि. २५ मे : गडचिरोली वनविभागाच्या परिसरातून पहाटे २ वाजता च्या सुमारास दोन तरुण हत्तींनी शहरात प्रवेश केल्याचे आढळून आले. सदर माहिती वनविभागाला मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ जलद प्रतिसाद दल नेमून त्यांच्या मदतीने हत्तीना शहरातून जंगलाकडे जाण्यासाठी मार्ग खुले करण्यात आले. त्यानंतर हत्ती सुरक्षित शहरातून बाहेर पडले असून सदर हत्तीवर रेस्पॉन्स टीम सतत निगराणी करत आहे व हत्तींच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले जात आहे.
हत्तींच्या उपस्थितीमुळे एका दुकानास किरकोळ नुकसान झाल्याची नोंद वनविभागाने घेतली असून, या घटनेचा तपास सुरू आहे. सद्यस्थितीत रेस्क्यू टीम घटनास्थळी कार्यरत आहे व हत्ती सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात परत जातील यासाठी उपाययोजना सुरू आहेत.
सध्या इंदिरानगर, पोटेगाव रोड, धानोरा रोड व इतर भागांतील नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी हत्ती आढळल्यास त्यांचा पाठलाग न करता अथवा फोटो काढण्याचा प्रयत्न न करता वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर त्वरित माहिती द्यावी, तसेच कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये. विशेषतः रात्रीच्या वेळेस शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे व सतर्क राहावे, असे आवाहन उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी केले आहे.