*अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी थेट अर्थसहाय्य*
गडचिरोली, दि. २३ : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांसाठी थेट अर्थसहाय्य देण्याच्या शासनाच्या योजनेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार योजनेत अमुलाग्र सुधारणा करून, वस्तू स्वरूपातील लाभ ऐवजी आता मंजूर अर्थसहाय्याची जास्तीत जास्त रक्कम तीन लाख पंधरा हजार रुपये थेट गटाच्या आधार क्रमांक संलग्न असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वयंसहाय्यता बचत गटातील सर्व सदस्य महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. गटातील किमान ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असणे बंधनकारक आहे. तसेच गटाचे अध्यक्ष व सचिव हेही त्या घटकांतील असावेत. गटाच्या नावे असलेले बँक खाते अध्यक्ष व सचिव यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. बचत गटाने खरेदी करावयाचा ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या संबंधित संस्थांद्वारे तपासणी झालेल्या आणि यादीत समाविष्ट उत्पादकांच्या मानकांनुसार असणे आवश्यक आहे.
शासन मान्य दरानुसार अर्थसहाय्य मंजूर करून ते संबंधित गटाच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. योजनेचा लाभ घेणाऱ्या सदस्याने अधिकृत संस्थेकडून ट्रॅक्टर चालविण्याचे प्रशिक्षण घेऊन त्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अर्थसहाय्य घेतल्यानंतर ट्रॅक्टर व उपसाधने विकता अथवा गहाण ठेवता येणार नाहीत. यासाठी गटाला १० वर्षांपर्यंत दरवर्षी हमीपत्र सादर करावे लागेल. यापूर्वी पावर टिलर अथवा मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतलेले बचत गट या योजनेस पात्र राहणार नाहीत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र स्वयंसहाय्यता बचत गटांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी ९४२३११६१६८ या क्रमांकावरही संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.