*खरिपाची लागली चाहूल आणि कृषी सहायकाने उचलले आंदोलनाचे पाऊल*

महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना तालुका शाखा गडचिरोली, यांचे द्वारा कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्या पूर्ण होण्यासाठी दिनांक 7 मे 2025 रोजी गडचिरोली तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक व कृषी सेवकांनी तालुका कृषी अधिकारी गडचिरोली कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. ज्या मागण्यांसाठी कृषी सहाय्यक वर्ग आज आंदोलनासारखी भूमिका घेत आहे त्या मागण्या पुढील प्रमाणे,
1.कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी.
2. कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावे.
3. कृषी विभागाचे कामकाज कालानुरूप ऑनलाइन व डिजिटल होत असताना सुद्धा कृषी सहायकांनी वारंवार मागणी करूनही शासनामार्फत लॅपटॉप दिले जात नाही, ते त्वरित उपलब्ध करून द्यावेत.
4. कृषी सहाय्यकांना ग्रामस्तरावर काम करण्यासाठी मानधन तत्वावर कायमस्वरूपी कृषी मदतनीस उपलब्ध करून देणे.
5. ग्राम स्तरावर निविष्ठा वाटपा संदर्भात वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्यात सुसूत्रता येत नसून, कृषी सहायकांना वाहतूक भाडेपोटी आर्थिक भार सहन करावा लागतो. तरी मार्गदर्शक सूचनेमध्ये विविध योजनेत कृषी सहाय्यक यांना वाहतूक भत्त्याची तरतूद करण्यात यावी.
6. कृषी विभागाचा आकृती बंधास तात्काळ मंजुरी देण्यात यावी व कृषी पर्यवेक्षक यांची पदे वाढवून कृषी सहाय्यकांच्या पदोन्नती मधील कुंठीत अवस्था दूर करावी तसेच महसूल विभागाप्रमाणे कृषी विभागाचा आकृतीबंध तयार करावा.
7. पोखरासारख्या महत्त्वाकांक्षी योजनेत मदतनीस म्हणून समूह सहाय्यक यांची नेमणूक करण्यात यावी.
8. नैसर्गिक आपत्तीवेळी पंचनामे करणे व तदनंतर करावयाच्या कामकाजाबाबत महसूल ग्रामविकास व कृषी विभागाच्या जबाबदाऱ्यांबाबत योग्य व न्यायसंगत कार्यपद्धती तयार करण्यात यावी. यामध्ये वारंवार कृषी विभागावर होत असलेला अन्याय दूर व्हावा.
9. कृषी सहाय्यक संवर्गाच्या आस्थापनाविषयी सर्व अडी अडचणी तात्काळ सोडवण्यात याव्यात.
10. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत क्षेत्रीय स्तरावरील अडचणी लक्षात घेऊन लक्षांक देण्यात यावे.
यासारख्या मागण्यांसह कृषी सहाय्यक यांनी आंदोलन उभारले असून, मागण्या तात्काळ पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल अशी माहिती श्री. किशोर रायसिडाम जिल्हा सचिव, श्रीमती वर्षा कुमरे जिल्हा महिला प्रतिनिधी श्रीमती कीर्ती सातार जिल्हा महिला प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना जिल्हा गडचिरोली तसेच कु. लीना आलाम तालुका अध्यक्ष, श्री.किशोर भैसारे, तालुका सचिव महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना तालुका शाखा गडचिरोली यांनी दिली. सदर धरणे आंदोलन यशस्वी करण्याकरिता तालुक्यातील कृषी सहाय्यक व कृषी सेवक यांचे अमूल्य सहकार्य लाभले.