*जिल्ह्यात जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष कृती कार्यक्रम*
गडचिरोली (जिमाका), दि. २५: मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या “१०० दिवसांचे लक्ष” या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी विविध सेवांचे सुसूत्रीकरण आणि सरलीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त न झालेल्या अर्जदारांसाठी विशेष कृती कार्यक्रम राबवण्यात येत आहे.
शैक्षणिक, सेवाभरती, निवडणूक व इतर प्रयोजनांसाठी सन २०२४-२५ मध्ये जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज दाखल केलेल्या व अद्याप वैधता प्रमाणपत्र न मिळालेल्या अर्जदारांनी, पूर्वी कळविण्यात आलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह समिती कार्यालयात उपस्थित राहावे.
यासाठी समिती कार्यालयात “विशेष त्रुटी पूर्तता मोहीम कक्ष” स्थापन करण्यात आले असून, त्रुटींची पूर्तता केलेल्या प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करून निर्णय घेण्यात येत आहे. मात्र अनेक प्रकरणे अजूनही त्रुटीमुळे प्रलंबित आहेत.
अशा सर्व अर्जदारांसाठी दिनांक २७ मार्च २०२५ रोजी “विशेष कृती कार्यक्रम” आयोजित करण्यात आला आहे.
या दिवशी अर्जाची पावती, जात दावा सिद्ध करणारी सर्व महसुली व शालेय मूळ व छायांकित कागदपत्रे घेऊन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
शासकीय आय.टी.आय. चौक, एल.आय.सी. रोड कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसुदन धारगावे यांनी केले आहे.