*अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा अनुदान योजना* *अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2025*
गडचिरोली दि .१५ : राज्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित / विना अनुदानित/ कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी सन 2024-2025 या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे.
ही योजना अल्पसंख्याक विकास विभागाच्या शासन निर्णय, क्र. अविवि 2015/ प्र.क्र.80/ 15/ का.6, दिनांक 07.10.2015 अन्वये अमलात आहे. या योजनेंतर्गत ₹10.00 लक्ष पर्यंतचे अनुदान मिळवण्यासाठी इच्छुक संस्थांनी प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती कार्यालय, नियोजन भवन, गडचिरोली येथे दिनांक 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा.
शाळांमध्ये शुद्ध पेयजल व्यवस्था आणि इन्वर्टर / जनरेटर सुविधा निर्माण करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. प्राप्त प्रस्तावांची छाननी करून आवश्यक त्रुटी दुरुस्त करण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर अंतिम पात्र संस्थांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनास सादर केले जातील. 22 फेब्रुवारी 2025 नंतर प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत, असे जिल्हा नियोजन अधिकारी यांनी कळविले आहे.