ताज्या घडामोडी

*बेरोजगार युवकांना भरघोस विद्यावेतनासह सहा महिने मिळणार अनुभवाची संधी*

 

▪️मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

*जिल्ह्यात आतापर्यंत 510 मनुष्यबळाची मागणी तर 350 युवक-युवतींची नोंदणी*

*बारावी पास 6 हजार, आयटीआयसाठी 8 हजार, पदवीधर,पदव्युत्तर 10 हजार रूपये विद्यावेतन*

गडचिरोली,दि. २७: शिक्षण पूर्ण करुन नोकरीसाठी अनुभवाच्या शोधात असलेल्या युवा वर्गाला विद्यावेतनासह शिक्षणाच्या बळावर अनुभवाची जोड देता यावी या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत युवकांना विद्यावेतनासह नोकरीचा अनुभव मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाली असून बारावी पास, आयटीआय, पदविका आणि पदविधर किंवा पदव्युत्तर युवकांनी या योजनेच्या लाभासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

उमेदवारांनी विविध शासकीय , निमशासकीय कार्यालयातील तसेच उद्योजकाकडील विविध पदावररील कामाचा अनुभव प्राप्त करण्यासाठी सहा महिन्याकरिता इंटर्नशीप म्हणून ज्युनिअर अकाऊंट ऑफिसर,ज्युनिअर इंजिनिअर,ज्युनिअर क्लर्क, असिस्टंट अकाऊंट आफिसर,प्राथमिक शिक्षक,माध्यमिक शिक्षक,डाटा एन्ट्री ऑपरेटर, संगणक ऑपरेटर या पदाकरिता उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावे.

बारावी पास विद्यार्थ्यांना प्रतिमहा सहा हजार, आयटीआय/पदविका उत्तीर्ण युवकांना आठ हजार व पदविधर/पदव्युत्तर युवकांना दहा हजार असे भरघोस विद्यावेतन या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे. हे विद्यावेतन प्रशिक्षणार्थींच्या थेट बँक खात्यात ऑनलाईन पध्दतीने दरमहा राज्य शासनाकडून अदा केले जाईल. याव्यतिरिक्त उद्योगांकडूनही प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन देण्याची मुभा असेल. प्रशिक्षणार्थी एका ‍ महिन्यात दहा दिवस किंवा त्यापेक्षा जास्त ‍दिवस गैरहजर असेल तर त्या महिन्याचे विद्यावेतन त्यांना दिले जाणार नाही. या योजनेंतर्गत खाजगी क्षेत्रातील उद्योजकांना एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या १० टक्के व सेवा क्षेत्रासाठी २० टक्के तर शासनाच्या शासकीय/निमशासकीय या आस्थापना/उद्योग/ महामंडळ यामध्ये मंजूर पदाच्या ५ टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील. गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत विविध आस्थापनांकडून ५१० मनुष्यबळाची मागणी नोंदविण्यात आली आहे तर ३५० उमेदवारांनी योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावर अर्ज केले आहेत.

या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. याचबरोबर उमेदवाराचे वय किमान 18 व कमाल 35 वर्ष असावे. उमेदवार महाराष्ट्राचा अधिवासी असावा. त्याची आधार नोंदणी आवश्यक असून बँक खातेही आधारशी संलग्न असावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या आस्थापनांना पुढे यायचे आहे त्या आस्थापना/उद्योगाची स्थापना किमान तीन वर्षापूर्वीची असावी. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास विभाग, बॅरेक क्रमांक 2, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, गडचिरोली येथे संपर्क साधावा असे कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी कळविले आहे.
00000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button