खासदार किरसान यांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची एका चुकीवर तंबी

काँग्रेसचे चिमूर-गडचिरोली मतदारसंघाचे खासदार नामदेव किरसान यांना मंगळवारी लोकसभेत बोलण्याची संधी मिळाली. डोक्यावर गांधी टोपी आणि पांढरी शुभ्र कपडे परिधान केलेल्या किरसान यांनी आपल्या मतदारसंघातील रेल्वे मार्गाचा मुद्दा उपस्थित केला.पण प्रश्नावर उत्तर मिळण्याआधीच त्यांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एका चुकीवर तंबी दिली.किरसान हे प्रश्न विचारत असताना खिशात हात घालून ऐटीत बोलत होते. बिर्ला यांच्या नजरेतून हे दृश्य सुटले नाही. प्रश्न विचारून झाल्यानंतर त्यांनी लगेच त्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. प्रश्न विचारत असताना किंवा यापुढेही भाषण करताना खिशात हात घालून बोलू नका, अशी सूचना बिर्ला यांनी दिली.
रेल्वेमंत्र्यांच्या उत्तरानंतर पुन्हा बोलण्यास उभ्या राहिलेल्या खासदार किरसान यांनी यावेळी मात्र अध्यक्षांच्या सूचनेचे पालन करत खिशात हात जाऊ दिला नाही. अध्यक्षांनी काहीवेळा इतर सदस्यही असेच खिशात हात घालून बोलत असल्याचे सांगत त्यांनाही यापुढे असे न करण्याच्या सूचना दिल्या.
रेल्वेमंत्र्यांचे ठाकरेंकडे बोट
दरम्यान, किरसान यांनी वडसा ते गडचिरोली रेल्वेमार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याचा मुद्दा मांडला. या मार्गाचे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा मार्ग अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगताना ठाकरे यांचे सरकार असताना भूसंपादन झाले नाही, असे स्पष्ट केले.शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर भूसंपादन पूर्ण झाले असून रेल्वेमार्गाचे कामही सुरू झाल्याचे वैष्णव यांनी स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्रातील इतर रेल्वे मार्ग व कामांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली.