ताज्या घडामोडी

*शिक्षण व नोकरी मध्ये अनाथ बालकांना आरक्षण*

*अनाथ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षात करा सपंर्क*

गडचिरोली,दि.15(जिमाका): बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 अन्वये काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या अनाथ, निराधार बालकांना जातीचा दाखला नसल्यामुळे विविध शासकीय लाभांपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे अनाथ मुलांना राज्य शासनाच्या विविध सवलतीचा लाभ घेता यावा तसेच कुटुंबात राहून ज्या अनाथ बालकांचे संगोपन झालेले आहे अशा बालकांना संस्थात्मक व संस्थाबाह्य या नमुन्यात अनाथ प्रमाणपत्र वितरीत करण्यात येत आहे. या नुसार अनाथांना शिक्षण व नोकरीत यामध्ये 1 टक्के आरक्षण लागू करण्यात आलेला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात आता पर्यंत 157 अनाथ बालकांना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने अनाथ प्रमाणपत्र वितरीत करण्यात आलेले आहे. विविध विभागांच्या झालेल्या पद भरती मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील 05 बालके शासकीय नोकरीवर लागलेले आहेत.
अनाथ आरक्षण पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहे- “ संस्थात्मक” या प्रवर्गामध्ये ज्यांच्या वयाची 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले आहे व ज्यांचे शासन मान्यता प्राप्त संस्थामध्ये पालन पोषण झाले आहे(त्यांच्या नातेवाईकाची अथवा जातीची माहिती उपलब्ध असो किंवा नसो) अशा बालकांचा समावेश असेल. “संस्थाबाह्य” या प्रवर्गामध्ये ज्यांच्या वयाची 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले आहे व ज्यांचे शासन मान्यता प्राप्त संस्थाबाहेर/नातेवाईकांकडे संगोपन झालेले आहे अशा बालकांचा समावेश असेल.

अनाथ प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्रे- विहित नमुन्यातील लाभार्थी यांचा अर्ज, वडिलांचा मृत्युचा दाखला, आईचा मृत्युचा दाखला, जातीचा दाखला, लाभार्थी बालक यांचे आधार कार्ड, लाभार्थी पालकांचे आधार कार्ड, लाभार्थीचा जन्मदाखला, शाळेत शिकत असल्याचे प्रमाणपत्र(बोनाफाईड)किंवा टी.सी., अनाथ असल्याबाबत ग्रा.प/न.प.यांचे शिफारस प्रमाणपत्र, पासपोर्ट साईजचे फोटो. सर्व कागदपत्रे हे तीन बंच फाईल सह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सादर करावे.
अनाथ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी व अधिक माहिती करिता जिल्हा बाल संरक्षण कक्ष, गडचिरोली या कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक -०७१३२२२२६४५ तसेच Email Id : dcpu.gadchiroli@gmail.com यावर किंवा संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) मोबाईल क्र.९५९५६४४८४८ यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी केले आहे.
0000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button