सरकारचे ओबीसी विरोधी धोरण प्रचंड धोकादायक – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

साखळी उपोषण – संघटित होऊन सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन
देशात ओबीसींची संख्या अधिक असतानाही जाती जनगणनेला बगल देऊन सरकार ओबीसींना त्यांच्या मूळ हक्कापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र चालवीत आहे. सरकारने ओबीसींच्या संदर्भात जे धोरण राबविले आहे ते प्रचंड धोकादायक असून अशा ओबीसी विरुद्ध प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी संघटित होऊन संघर्षातून धडा शिकवण्याची काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते गडचिरोली येथे 4 मार्च पासून इंदिरा गांधी चौकात सुरू असलेल्या ओबीसी युवा समाज संघटना यांच्या बेमुदत साखळी उपोषण स्थळी मार्गदर्शनपर बोलत होते.
सध्या केंद्रात भाजप तर राज्यात माहिती सरकार आहे. या सरकारने महागाई प्रचंड प्रमाणात वाढली असताना देशात उद्धवलेली बेरोजगारी यावर कुठलाच कायमस्वरूपी तोडगा काढलेला नाही. उलट जातीपातीच्या राजकारणात गुंतवून युवकांची दिशाभूल करण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. अशातच सरकारने बिहारच्या धरतीवर जातीनिहाय जनगणना करावी, मराठा आरक्षण हे ओबीसी प्रवर्गातून देऊ नये, तसेच सरकारकडून सगळी सोयऱ्या बाबत काढलेली अधिसूचना रद्द करावी, लवकर भरती यात ओबीसींना योग्य न्याय द्यावा. अशा विविध मागण्यांना घेऊन ओबीसी युवा समाज संघटनेच्या वतीने गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात गेल्या 4 मार्चपासून बेमुदत साखळी उपोषण केले आहे. या उपोषणाकडे स्थानिक भाजप नेते व लोकप्रतिनिधी यांनी पाठ फिरवली असताना आज राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. यावेळी ओबीसी समाज बांधवांनी ओबीसी समाजाच्या व्यथा मांडणारे निवेदन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना दिले.
यावर मार्गदर्शनपर बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसींच्या मागण्या घेऊन आमचा सतत लढा सुरू आहे. आदिवासी किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण 6% वरून 17% वर करून दिले. तर मागील पोलीस भरतीमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी कमी जागा आरक्षित केल्याने ती भरती थांबवली होती. जर महाविकास आघाडी सरकारला अधिक वेळ मिळाला असता तर ओबीसींच्या अनेक मागण्यांना पूर्ण झाल्या असत्या. सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून बहुजन समाजाच्या युवकांना धर्मांध उन्मादातून दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. या गंभीर प्रकाराबाबत बहुजन समाजाने जागृत व संघटित होऊन मोठा लढा उभारला पाहिजे. तसेच ओबीसी विरुद्ध षडयंत्र रचनाऱ्या मनुस्मृति ठेचून काढण्यासाठी व या निष्ठूर निर्दयी व ओबीसी विरोधी सरकारला सत्तेतून बाहेर करण्यासाठी एकजूट होऊन पेटून उठणे हे आताच्या काळाची नितांत गरज आहे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या प्रसंगी प्रामुख्याने काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. नामदेव किरसान, डॉ. नितीन कोडवते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामन सावसाकडे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, प्रभाकर वासेकर युवक काँग्रेसचे विश्वजीत कसे येलेकर सर, राहुल भांडेकर , चुदरी व बहुसंख्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेकडोंच्या संख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.