ताज्या घडामोडी

*शेतकरी उत्पादन कंपन्यांना चालना देणारी कार्यशाळा संपन्न*

गडचिरोली, दि. १७ जुलै: जिल्ह्यातील शेतकरी उत्पादन कंपन्या(एफ.पी.ओ.), महिला बचत गट आणि शेतकरी गटांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजना आणि उपक्रमांची माहिती देण्यासाठी आज जिल्हा स्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग आणि जिल्हा अमलाबजावणी संस्था (स्मार्ट प्रकल्प) यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय फळ रोपवाटिका, सोनापूर येथे पार पडली.

कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश गायकवाड यांच्या हस्ते झाले. त्यांनी “The Package of Incentives 2019” या योजनेंतर्गत मिळणाऱ्या लाभांची माहिती देत शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तर आत्मा प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.

स्मार्ट प्रकल्पच्या नोडल अधिकारी अर्चना कोचरे यांनी शासनाच्या योजनांचा फायदा घेताना एफ.पी.ओ. सशक्त करण्याचे महत्व सांगितले. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री. वाकडे यांनी शेतकरी कंपन्यांसाठी वीज जोडणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. नागपूर येथील सनदी लेखापाल सुभाष रहांगडाले यांनी सविस्तर व्यवसाय आराखडा तयार करताना येणाऱ्या अडचणींचे विश्लेषण केले.

नायब तहसीलदार हेमंत मोहरे यांनी भाडेपट्टी करार, आवश्यक कागदपत्रे आणि कृषी आधारित उद्योगांसाठी लागणाऱ्या परवानग्यांविषयी माहिती दिली. तसेच अहेरीचे उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी कृषी विभागाच्या योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कैलाश शहारे यांनी केले.

या कार्यशाळेमुळे जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक माहिती मिळाली असून, अडचणींवर उपाययोजना शोधण्यास मदत झाली आहे. एफ.पी.ओ. सशक्त करण्यास आणि कृषी विकासाला चालना देण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात श्री. पाटील, डॉ. कापगते, श्री. आंबेडारे, श्री. गायकवाड, श्री. मदनकर, श्री. कांबळे, श्री. माटे, श्री. मुनघाटे यांच्यासह आत्मा व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button