ताज्या घडामोडी

*स्वामित्व योजनेमुळे जमिनीशी संबंधित वादाचे त्वरित निराकरण – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*

गडचिरोली, दि. 18 : स्वामित्व योजनेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या जमिनीच्या सीमांचे निर्धारण होऊन मालकी हक्काची सनद मिळाली आहे. यामुळे जमिनीशी संबंधित वाद त्वरित निकाली लागतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील 50 लाखाहून अधिक घरमालकांना मालमत्ता कार्डांचे ऑनलाईन वितरण आज करण्यात आले. या योजने अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील 60 गावांमधील 10,449 मालमत्ता धारकांना 8,156 मालमत्ता कार्डांचे (सनद) वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित कार्यक्रमात हा वितरण सोहळा पार पडला. यावेळी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते सनद वाटप कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले.

कार्यक्रमाला खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षक नंदा आंबेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवी कनसे, आणि श्री. प्रशांत वाघरे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पंडा यांनी यावेळी सांगितले की, स्वामित्व योजनेमुळे मालमत्तेच्या कायदेशीर मालकीची खात्री होऊन कर्ज मिळणे सुलभ झाले आहे. या योजनेचा लाभ 100 टक्के नागरिकांना मिळवून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. यासाठी भूमी अभिलेख व ग्रामपंचायत विभागाने जोमाने प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार डॉ. मिलिंद नरोटे व प्रशांत वाघरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षक नंदा आंबेकर यांनी केले. त्यांनी सांगितले की, ड्रोनच्या साहाय्याने गावठाणातील मिळकतींचे अचूक मोजमाप, नकाशा व मालमत्ता पत्रक तयार करण्यात आले आहे. स्वामित्व योजनेचे फायदे सांगताना त्यांनी योजनेमुळे मालकी हक्कासह सुरक्षिततेची हमी मिळाल्याचे स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना व्यसनमुक्ती व स्वच्छतेची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाला विविध गावचे सरपंच, ग्रामस्थ तसेच भूमी अभिलेख आणि ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button