ताज्या घडामोडी

केन्द्रीय मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा शपथविधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी, सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप करण्यात आले. अत्यंत महत्त्वाची संरक्षण, अर्थ, गृह आणि परराष्ट्र ही खाती गेल्या सरकारमधील मंत्र्यांकडे कायम राहिली आहेत.

नितीन गडकरींकडे सलग तिसऱ्यांदा रस्ते विकास मंत्रालय देण्यात आले असून कृषी, रेल्वे ही महत्त्वाची खाती भाजपने स्वत:कडे ठेवली असून नागरी विमान वाहतूक, उद्याोग ही खाती मित्रपक्षांना दिली गेली आहेत.

मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण, अमित शहा यांच्याकडे गृह व सहकार, निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थ आणि एस. जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार ही दुसऱ्या कार्यकाळातील खाती कायम राहिली आहेत. आघाडीचे सरकार चालवावे लागणार असले तरीही कृषि, रेल्वे, माहिती-तंत्रज्ञान, माहित-प्रसारण, वाणिज्य, आरोग्य, शिक्षण, पेट्रोलियम आदी कळीची मंत्रालये भाजपने स्वत:कडेच ठेवली. घटक पक्षांपैकी जनता दलाचे (ध) एच. डी. कुमारस्वामी यांची कृषी खात्याची मागणी होती. मात्र त्यांना उद्याोग व पोलाद मंत्रालय देण्यात आले आहे. तेलगु देसमचे के. राममोहन नायडू यांना यापूर्वी ज्योतिरादित्य शिंदेंकडे असलेले महत्त्वाचे नागरी विमान वाहतूक मंत्रालय देण्यात आले आहे. शिंदे यांच्यावर दूरसंचार खात्याचा भार असेल. वाणिज्य, शिक्षण, पर्यावरण, पेट्रोलियम, बंदर

जहाज बांधणी ही खाती अनुक्रमे पीयुष गोयल, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, हरदीप पुरी, सर्बानंद सोनोवाल यांच्याकडे कायम ठेवण्यात आली आहेत. लोकसभेत भाजपचे पूर्ण बहुमत नसल्याने संसदीय कार्यमंत्रीपदाला महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजपचे ईशान्येकडील ज्येष्ठ नेते किरेन रिजिजू यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.

मोदींच्या विश्वासातील मानले गेलेले मनसुख मांडविय यांचे आरोग्य खाते काढून त्यांना तुलनेत कमी महत्त्वाचे कामगार कल्याण व रोजगार, युवा-क्रीडा खाते दिले गेले आहे. सी. आर. पाटील पहिल्यांदाच मंत्री बनले असून त्यांच्याकडे मोदींचे लक्ष असलेले जलशक्ती मंत्रालय देण्यात आले आहे. यापूर्वी हे खाते गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे होते. शेखावत यांची पदावन्नती झाली असून त्यांच्याकडे संस्कृती व पर्यटन खाते देण्यात आले आहे. अन्नपूर्णा देवी यांना बढती देण्यात आली असून महिला व बालकल्याण खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे. हे खाते पूर्वी स्मृति इराणी सांभाळत होत्या. आरोग्य मंत्रालय पुन्हा जे. पी. नड्डा यांच्याकडे देण्यात आले आहे. भाजप

होण्यापूर्वी त्यांनी हेच खाते सांभाळले होते. अर्जुनराम मेघवाल यांच्याकडे विधि-कायदा मंत्रालय कायम ठेवले आहे.

ग्रामीण भारताची जबाबदारी चौहानांकडे

कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास ही ग्रामीण भारताच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली तिन्ही खाती मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे एकवटण्यात आली आहेत. पूर्वीच्या सरकारमध्ये नरेंद्रसिंह तोमर या मध्यप्रदेशातील नेत्याकडेच कृषिमंत्रालय होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये भाजपला फटका बसल्याच्या पार्श्वभूमीवर चौहान यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आल्याचे मानले जात आहे.

वैष्णव यांच्यावर वाढीव जबाबदारी

रेल्वे, माहिती-तंत्रज्ञान ही दोन्ही मंत्रालये अश्विनी वैष्णव यांच्याकडे कायम राहिली असून माहिती-प्रसारण हे आणखी एक महत्त्वाचे खातेही त्यांच्याकडे देण्यात आले आहे. पायाभूत विकासाशी निगडीत तीन खाती वैष्णव यांच्याकडे असतील. यातून त्यांच्यावर मोदींनी दाखवलेला विश्वास स्षष्ट होतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button