विश्वगुरूचे अज्ञान

गांधीजींचे वैश्विक असणे नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग, ऑन सॉंग स्यू की आणि बराक ओबामा यासारख्या दूरस्थ माणसांना आणि जगभरच्या विद्यापीठांना ठाऊक होते ते भारताच्या पंतप्रधानांना ठाऊक नसावे हे आपले राष्ट्रीय दुर्दैव आहे.
सर रिचर्ड अॅटनबरो यांनी दिग्दर्शित केलेला गांधी हा चित्रपट 1982 मध्ये प्रदर्शित झाला. त्यातील टॉलस्टॉय आश्रमाचे चित्रीकरण पुण्याजवळ पनवेलच्या परिसरात झाले. त्यावेळी त्यांना भेटायला सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक राजदत्त हे गेले होते. त्यांनी अॅटनबरोंना विचारले, “जगातल्या सर्व देशांत स्वातंत्र्यासाठी लढलेले महापुरूष झाले. अमेरिकेत वॉशिंग्टन, आयर्लंडमध्ये इमॉन द व्हॅलेरा, युरोपात लेनिन, आशियात माओ हे सारे झाले. या साऱ्यांना सोडून तुम्ही गांधींवर चित्रपट का काढला?” त्यावर अॅटनबरो म्हणाले, “देशाच्या स्वातंत्र्यासाठी हाती तलवार घेऊन लढलेले देशभक्त जगातल्या सर्व देशांत झाले. पण हाती शस्त्र न घेता देशाचे स्वातंत्र्य मिळवणारा महात्मा फक्त तुमच्या देशात झाला आणि त्याचे नाव गांधी होते.” पुढल्या काळात राजदत्त यांनी माझ्याच कादंबरीवर एक चित्रपट काढला. त्यावेळी त्यांनी ही कथा मला सांगितली तेव्हा आम्ही दोघेही गहिवरलो होतो. पण गांधींचे मोठेपण अॅटनबरोंएवढेच साऱ्या जगाने कधीचेच ओळखले होते. 2) 1869 मध्ये जन्माला आलेले गांधी बॅरिस्टर होऊन 1893 मध्ये द.आफ्रिकेत गेले. तेथील 21 वर्षांत त्यांनी जी
केली, तिनेच हे जग अचंबित झाले. त्या काळात झालेल्या बोअर युद्धात स्वयंसेवकांचे पथक उभारून रणांगणावर जखमी झालेल्या ब्रिटीश सैनिकांना दवाखान्यांपर्यंत पोहचवण्याचे काम त्यांनी केले. त्यात एका सैनिकाला त्यांच्या पथकाने 40 मैलांपर्यंत उचलून नेले. त्यातले काही मैल एकट्या गांधींनी त्याला आपल्या खांद्यावर घेतले होते. त्यांच्या या सेवेचा गौरव म्हणून ब्रिटीश सरकारने ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ हा आपला सर्वोच्च लष्करी सन्मान त्यांना बहाल केला. (पुढे जालियनवाला बागेतील हत्याकांडानंतर त्यांनी तो परत केला.)द. आफ्रिकेत असतानाच त्यांनी तेथील गोऱ्या सरकारने कृष्णवर्णियांवर केलेल्या अत्याचाराची कैफियत लिहिली. ती साऱ्या जगातील वृत्तपत्रांनी प्रकाशित केली. त्यामुळे संतापलेल्या तेथील गोऱ्यांनी ते समुद्रावर असताना त्यांची बोट अडविली. परिणामी त्यांना 21 दिवस सहकुटुंब त्या बोटीवर राहावे लागले. नंतरही त्यांच्यावर दगडफेक झाली व ते रक्तबंबाळ झाले, त्यावेळी तेथील गोऱ्या वकिलांनीही त्यांना पोलिसात तक्रार दाखल करण्याची सूचना केली. “पण ज्यांच्यासोबत मला राहायचे आहे, त्यांच्याविरुद्ध
तक्रार करणार नाही” असे उत्तर देऊन गांधीजींनी त्यांना शांत केले. याच काळात त्यांना त्यांच्या सामानासह रेल्वेतून फलाटावर फेकून देण्याची घटना जोहान्सबर्गमध्ये झाली. या सबंध काळात ते अनेक दिवस तेथील सरकारच्या तुरुंगातही राहिले. त्यांच्यासोबत 1200 मैलांची पदयात्रा करणाऱ्या कस्तुरबाही तुरुंगात राहिल्या. 3) 1915 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी सावरकरांची सुटका करा, असा ठराव 1917 मध्ये मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीत मंजूर करून घेतला. पुढे तसाच ठराव त्यांनी 1919 मध्ये काकिनाडा येथे भरलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनातही मंजूर करून घेतला. (सावरकरभक्तांना आता याची आठवण नसावी.) नंतरच्या काळात गांधी कस्तुरबांना भेटून सावरकरांच्या भेटीला रत्नागिरीलाही जाऊन आले. द मेकिंग ऑफ गांधी (गांधी चित्रपटावरील 50 मिनिटांची डॉक्युमेंटरी)4) याच दरम्यान त्यांच्या नेतृत्वात चंपारणचा शेतकऱ्यांचा लढा यशस्वी झाला आणि जालियनवाला बागेतील हत्याकांडाचा सारा अहवाल प्रत्यक्ष अमृतसरमध्ये राहून त्यांनी लिहून काँग्रेस पक्षाला सादर केला. 5) याच काळात राष्ट्रनेते असलेल्या लोकमान्य टिळकांनी माझ्या पश्चात ‘गांधी’ या देशाचे नेतृत्व करील असे म्हटले.
1919 च्या मॉन्टेस्क्यू चेमस्फर्ड कायद्यानुसार झालेल्या निवडणुकीत गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेसने देशाच्या केंद्रीय विधीमंडळात बहुमत मिळविले आणि बॅरिस्टर विठ्ठलभाई पटेल हे वल्लभभाईंचे थोरले बंधू त्याचे अध्यक्ष झाले. नंतरच्या काळात 1937 पर्यंत झालेल्या सर्व राष्ट्रीय व प्रांतिक निवडणुका गांधीजींच्या नेतृत्वात या देशाने जिंकल्या. याच काळात खिलाफत, असहकार, दांडी मार्च, व्यक्तिगत सत्याग्रह याही गोष्टी गांधींच्या नेतृत्वात देशात झाल्या. 7) या काळातच रविंद्रनाथांनी गांधीजींना ‘महात्मा’ म्हटले तर नेताजी सुभाषचंद्रांनी त्यांचा ‘राष्ट्रपिता’ म्हणून गौरव केला. 8) 1942 मध्ये त्यांच्या नेतृत्वात ‘चले जाव’चे जागतिक कीर्तीचे आंदोलन झाले. त्यानंतर 1945 पर्यंत ते तुरुंगात राहिले. भारतात त्यांनी आयुष्याची 13 वर्षे तुरूंगात काढली. 9) 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला आणि ज्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी साऱ्या आयुष्याचा संग्राम केला, ते स्वातंत्र्य त्यांना फक्त सहा महिने अनुभवता आले. 30 जानेवारी 1948 या दिवशी गोडसेने गांधीजींचा खून केला. 10) अॅटनबरोंचा चित्रपट त्यानंतर 35 वर्षांनी
झाला.11) गांधीजींचे पहिले मराठी चरित्र 1918 मध्ये अवंतिकाबाई गोखले यांनी लिहिले. त्याला लोकमान्य टिळकांची प्रस्तावना आहे. नंतरच्या काळात रोमारोला या नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेंच लेखकाने 1927 मध्ये त्यांचे समग्र चरित्र लिहिले. पुढे लुई फिशर, विल ड्युरांट यांनीही त्यांची चरित्रे लिहिली. गांधीजींची चरित्रे वा त्यांच्याविषयीचे संदर्भ असलेले जगात एक लाखाहून अधिक ग्रंथ आज उपलब्ध आहेत. 12) गांधीजींनी त्यांच्या सत्याग्रहाच्या काळात इंग्लंडला भेट दिली तेव्हा त्या देशाचे सारे नेते, अभिनेते, लेखक, चित्रकार, कलावंत आणि सामान्य जनता यांनी त्यांना पाहण्यासाठी व भेटण्यासाठी गर्दी केली. एकटे चर्चिल त्यांच्यावरील रागामुळे त्यांना भेटायला आले नाहीत. पुढल्या काळात घनश्यामदासजी बिर्ला आणि मीराबेन यांनी चर्चिलना गांधीजींच्या अद्वितीय आयुष्याची कथा सांगितली तेव्हा आपल्या कृतीचा त्यांना विलक्षण पश्चात्ताप झाला आणि ‘गांधींनी मला पत्र पाठवल्यास मी त्यांना भेटायला येईन,’ असे त्यांनी हिंदुस्थानचे त्यावेळचे गव्हर्नर जनरल लॉर्ड वॅव्हेल यांना लिहिले. गांधीजींनी, ‘मी साऱ्यांच्या स्वागताला तयार
एवढेच त्या गव्हर्नर जनरलला कळविले. 13) सन 2000 मध्ये युनायटेड स्टेट्स एक्सप्रेस या नियतकालिकाने जगभरच्या दहा हजार लोकांची निवड एका प्रश्नासाठी केली. या लोकांत वेगवेगळ्या देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान, सेनापती, संशोधक, प्रतिभावंत, नोबेल पारितोषिक विजेते आणि ग्रंथकार यांचा समावेश होता. या साऱ्यांना त्या नियतकालिकाने विचारलेला प्रश्न, ‘इ.स. 1000 ते 2000 या हजार वर्षांत जगात झालेला सर्वश्रेष्ठ माणूस कोणता’ हा होता. या दहा हजारांपैकी 8,886 लोकांनी ‘गांधीजीं’चे नाव घेतले. गांधीजींचे वैश्विक असणे नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग, ऑन सॉंग स्यू की आणि बराक ओबामा यांसारख्या दूरस्थ माणसांना आणि जगभरच्या विद्यापीठांना ठाऊक होते, ते भारताच्या पंतप्रधानांना ठाऊक नसावे हे आपले राष्ट्रीय दुर्दैव आहे.एवढे विलक्षण आयुष्य आणि एवढी वैश्विक लोकप्रियता मिळवणारा महापुरुष या देशात झाला, त्याची ओळख जगाला आणि नरेंद्र मोदींना अॅटनबरोंच्या चित्रपटाने झाली असेल तर ती स्वतःला विश्वगुरू म्हणवून घेणाऱ्या त्या गृहस्थाचे अपुरेपण सांगणारी बाब ठरावी. मात्र त्याच्या या अपुरेपणाचे
आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. जो माणूस वा नेता आपल्या पक्षाच्या जन्मदात्या संघाला विसरतो, त्याने गांधी लक्षात ठेवला नसेल तर ती फारशी खेदाची बाब नाही. जाता जाता एवढेच विचारायचे, की गांधी हे जन्माने गुजराथी होते हे तरी त्या गुजराथ्याला ठाऊक आहे काय.. – सुरेश द्वादशीवार