कोविशील्ड या कोरोनाप्रतिबंधक लशीवरून चांगलाच गदारोळ

चार वर्षांपूर्वी कोरोनाने हाहाकार माजवला होता. आता कोविशील्ड या कोरोनाप्रतिबंधक लशीवरून चांगलाच गदारोळ माजलाय. कोविशील्डच्या साइड इफेक्ट्सबद्दल रिपोर्ट आल्यानंतर व कंपनीने दुष्परिणामाची कबुली दिल्यानंतर लोक गोंधळले
आता कोव्हॅक्सीन बनवणाऱ्या भारत बायोटेकने एक निवेदन दिलंय. त्यात त्यांनी व्हॅक्सीनच्या परिणामांपेक्षा लोकांची सुरक्षा आधी असल्याचं म्हटलं आहे. यात भारत बायोटेकने म्हटलं आहे, की कोव्हॅक्सीन ही भारत सरकारच्या आयसीएमआरकडून निर्माण करण्यात आलेली एकमेव लस आहे. ही लस प्रभावी असण्याबद्दल अनेक चाचण्या झाल्या आहेत. लस किती प्रभावी आहे, याचा विचार करण्याआधी लोकांच्या सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा आहे.
भारत बायोटेकने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक निवेदन प्रसिद्ध केलंय. लशीचं लायसन्स मिळविण्याच्या प्रक्रियेत 27 हजारांहून अधिक जणांवर कोव्हॅक्सिनचा वापर करण्यात आला आहे. क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाल्यानंतरच लायसन्स देण्यात आलं. यासोबतच भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून कोव्हॅक्सिनच्या सुरक्षिततेची चाचणीही करण्यात आली होती, असं
निवेदनात म्हटलं आहे, असं वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे.
भारत बायोटेकने म्हटलं की कोव्हॅक्सिनच्या अभ्यासातून हे स्पष्ट झालंय की याचा रेकॉर्ड सुरक्षित आहे. ट्रायलदरम्यान व्हॅक्सीन घेतल्यावर कोणत्याही व्यक्तीमध्ये कोणतीही वाईट लक्षणं दिसली नाहीत. या लक्षणांमध्ये रक्ताच्या गुठळ्या, थ्रोम्बोसायटोपेनिया, पेरीकार्डायटिस (हृदयाच्या आजूबाजूच्या पिशवीला प्रभावित करणारी सूज) आणि मायोकार्डायटिस (हृदयाच्या ऊतींमध्ये सूज) यांचा समावेश होतो. व्हॅक्सीन बनवणाऱ्या पूर्ण टीमला माहीत होतं की या लसीचा प्रभाव अल्पकाळ असू शकतो; पण लोकांच्या सुरक्षेबद्दल तिचा प्रभाव आयुष्यभर राहू शकतो, असंही भारत बायोटेकने म्हटलंय.
कोविशील्डचा वाद नेमका काय?
नुकतंच अॅस्ट्राझेनेका (AstraZeneca) कंपनीने ब्रिटनच्या उच्च न्यायालयात कबूल केलं की कोविड-19 लसीमुळे थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोमसारखे (टीटीएस) साइड इफेक्ट्स होऊ शकतात. या
थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोममुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ लागतात किंवा शरीरात प्लेटलेट्स वेगाने कमी होऊ लागतात. शरीरात रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोकाही वाढतो.
अॅस्ट्राझेनेका कंपनीच्या कोरोना लशीच्या कथित दुष्परिणामांच्या बातम्या आल्यावर भारतात कोविशील्डचे डोस घेणाऱ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. सोशल मीडियावरही या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीच्या वातावरणात विरोधी पक्षांनीही लशीच्या विश्वासार्हतेबाबत मोदी सरकारची कोंडी केली आहे.