गडचिरोली-चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरील पोहार नदीनजीकच्या पोचमार्गाचे बांधकाम रखडले, जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज, कंत्राटदार अभियंत्यांची ऐकेना, आजी-माजी लोकप्रतिनिधी हतबल

गडचिरोली : एकीकडे राष्ट्रीय महामार्ग मंत्री महामार्गावरून विमानाची धावपट्टी निर्माण करण्याची योजना करत असताना दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यात मात्र गडचिरोली-चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या बांधकामासोबतच कुरुडजवळील पोहार नदी पुलानजीक पोच मार्गाचे बांधकाम रखडले असून याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता जनतेकडून व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गडचिरोली या दुर्गम नक्षलग्रस्त आकांक्षित जिल्ह्यासाठी अब्जोवधी रुपयांचा निधी देऊन विविध ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग निर्माण केले. याचा मुख्य उद्देश दळणवळणाच्या सोयाीसोबतच नागरिकांना सुखकर प्रवास व्हावा, ही अपेक्षा होती. जिल्ह्यात विविध ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग निर्माण झाले असून काही ठिकाणी नव्याने मार्ग निर्माण कार्य प्रगतीपथावर आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्गाच्या या आधी असलेल्या कार्यकारी अभियंत्यांनी पूर्णपणे गडचिरोली-चामोर्शी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याने अनेक तांत्रिक चुका झाल्या असून अनेक ठिकाणी रस्ते आताच उखडले आहेत. तर काही ठिकाणी ठिगर लावून काम केले आहे. नदी-नाल्यावरील पुलांची उंची कमी असल्याने पावसाळ्यात वाहतूक बंद पडत आहे. अशातच गडचिरोली-चामोर्शी या राष्ट्रीय महामार्गावर कुरुड गावानजीक पोहार नदीवर पुलाचे बांधकाम होऊन सुमारे दोन वर्षे पूर्ण झाले. मात्र, या लगत असलेल्या पोचमार्गाचे काम रखडले आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्यांशी संपर्क केला असता, या रस्त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन जात आहे, त्यांनी अधिक मोबदला मिळावा, यासाठी न्यायालयात व अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितले असल्याची माहिती समोर आली आहे. यावर मार्ग काढण्यासाठी आजी-माजी खासदार, आमदारांनी अनेकदा राष्ट्रीय महामार्गाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्याशी बोलून समस्या मार्गी लावण्यासाठी सूचना केली. परंतु अभियंत्यांनी सदर कामाचे कंत्राटदार हे आपले ऐकत नसल्याचे सांगून बाजू मारून नेली. तसेच अभियंत्यांनी सदर पुलानजीक पोचमार्गाचे प्रलंबित असलेले काम तात्पुरता करण्यााठी डीपीडीसीतून निधी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था संबंधित लोकप्रतिनिधींकडे केली आहे. विशेष म्हणजे, हा पोचमार्ग झाला नसल्याने गेल्या दोन वर्षात या ठिकाणाहून आवागमन करणारी वाहने खराब झाली आहेत. त्यामुळे या महत्त्वाच्या प्रश्नाकडे आता जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असून जनतेला सुखकर प्रवासाची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली जात आहे