*पुनर्वापरातून पाण्याची बचत करा –विवेक साळुंखे*

*जल जागृती सप्ताहाचे उद्घाटन*
*75 हजार विद्यार्थ्यांना जलप्रतिज्ञा*
गडचिरोली दि. 16 : पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक असून पुनर्वापरातून पाण्याची बचत करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी विवेक साळुंखे यांनी आज केले.
जल जागृती सप्ताहानिमित्त जलसंपदा विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या जलजागृती अभियाना चा शुभारंभ श्री. विवेक साळुंखे यांच्या हस्ते गडचिरोली पाटबंधारे विभागाच्या प्रांगणात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोडी, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. इंगोले, शिक्षणाधिकारी वासूदेव भुसे, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव पाटील, जलसंवर्धन सामाजिक कार्यकर्त प्रकाश अर्जुनवार, मनोहर हेपट, लायड्स मेटलचे संचालक विक्रम मेहता, बँक ऑफ इंडिया मुख्य प्रबंधक मयुर कडबे याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री मोरघडे यांनी प्रस्ताविकातून जल जागृती सप्ताहाचा उद्देश व जलसंपदा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत रुपरेषा सादर केली. जल जागृती सप्ताहच्या आयोजनातून विद्यार्थ्यांमध्ये पाण्याचे महत्व, पाण्याचे संवर्धन, जल प्रदुषण, पाण्याची गुणवत्ता राखणे या विषयी जागृती निर्माण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्याकरीता जिल्हयातील सर्व शाळा व महाविद्यालयामध्ये जल प्रतिज्ञा उपक्रम राबविण्यात येत असुन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जिल्हास्तरावर आज 16 मार्च रोजी सुमारे 75 हजार विद्यार्थ्यांनी जलप्रतिज्ञा घेतल्याचे माहिती त्यांनी दिली. जल जागृती अभियान अंतर्गत जिल्हा, तालुका व गावपातळीवर जलप्रतिज्ञा, चर्चासत्र, वेबिनार, चित्रकला स्पर्धा, कार्यशाळा, जलदिंडी, प्रभातफेरी, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची प्रकल्पस्थळी भेटी इत्यादी जल जागृती करण्याचे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री. मास्तोळी, श्री. इंगोले, श्री. भूसे, श्री. अर्जुनवार, श्री. हेपट, श्री. मेहता यांनी, तसेच उपकार्यकारी अभियंता कु. पानतावणे यांनी जल जागृती विषयी प्रबोधन केले. कनिष्ठ अभियंता श्री. मंदमुले यांनी कविता सादर केली. कार्यक्रमाचे संचालन श्री. भांडेकर व आभार प्रदर्शन उपविभागीय अभियंता गणेश परदेशी यांनी केले.
सर्व उपस्थितांनी उद्घाटन समारंभ प्रसंगी सामुहिक जल प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाला जलसंपदा व पाटबंधारे विभागचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.