ताज्या घडामोडी

*जिल्ह्याचा विकास साधणे हाच माझ्यासाठी सर्वांत मोठा पुरस्कार – बालसुब्रमण्यम प्रभाकरन यांचे गौरवोद्गार

प्रेस क्लब च्या ‘जिल्हा गौरव’ पुरस्काराने सन्मान*

गडचिरोली,ता. ७ : माझ्यासह आपल्या सर्वांसाठी गडचिरोली जिल्हा ही पुण्यभूमी आहे. येथे आपल्यासोबत मीसुद्धा गडचिरोलीकर म्हणूनच काम करत आहे. आता या पुण्यभूमीत सर्वांगीण विकासाची पहाट उगवत आहे. आजवर अनेक पुरस्कार मिळाले असले, तरी गडचिरोली प्रेस क्लबने दिलेल्या या पुरस्काराचे माझ्या मनात विशेष स्थान आहे. सोबतच जिल्ह्यात पोलाद प्रकल्प उभारून सर्वांगीण विकास साधणे, हाच माझ्यासाठी सर्वांत मोठा पुरस्कार असेल, असे भावोद्गार लॉयड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर बालसुब्रमण्यम प्रभाकरन यांनी काढले.
आद्य पत्रकार तथा दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त प्रेस क्लब गडचिरोलीच्या वतीने ‘गडचिरोली जिल्हा गौरव’ पुरस्कार सोहळा शनिवार (ता. ६ ) स्थानिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडला. यंदा या पुरस्काराने लॉयड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर बालसुब्रमण्यम प्रभाकरन यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली प्रेस क्लबचे अध्यक्ष नंदकिशोर काथवटे होते. तसेच विशेष पाहुणे म्हणून राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, सहकारमहर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, शिवसेनेचे हेमंत जंबेवार आदी उपस्थित होते. बी. प्रभाकरन पुढे म्हणाले की, गडचिरोली प्रेस क्लबने दिलेला हा पुरस्कार केवळ माझ्या एकट्याचा नाही, तर तुमच्या सर्वांचा आहे. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे मला जिल्ह्यात उद्योग उभारण्याची संधी मिळाली आहे. इथे उद्योगाची उभारणी करताना अनेक अडचणींशी झुंजावे लागले. पण जिल्हावासींचे प्रेम, सदिच्छा व आशीर्वादामुळे खाणीसोबतच पोलाद प्रकल्प आकारास येत आहे. केवळ एखादा उद्योग उभारणे एवढाच मर्यादीत उद्देश नाही. हे जग झपाट्याने बदलत आहे. खाण क्षेत्रातही पर्यावरणपूरक नवनवे तंत्रज्ञान येत आहे. हे तंत्रज्ञान आपल्या जिल्ह्यातील होतकरू मुलांना शिकवायचे आहे. जिल्ह्यातील काही मुलांना आॅस्ट्रेलिया आणि इतर देशात अत्याधुनिक तंत्रज्ञान व कौशल्ये शिकण्यासाठी आम्ही पाठवत आहोत. पुढेही अनेकांना आम्ही परदेशात पाठवू. आपल्याला आपल्या पुढच्या पिढ्या उच्च शिक्षित, कौशल्यप्राप्त आणि सक्षम करण्यासाठीच एकत्र येऊन काम करायचे आहे. मला या जिल्ह्यात माझ्यासारखेच असंख्य उद्योजक प्रभाकरन निर्माण करायचे आहेत, असेही ते म्हणाले. अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, जिल्ह्यात टाटांपासून अनेक उद्योजक येऊन गेले. परंतु त्यांनी जिल्ह्यात उद्योग उभारण्याचे धाडस केले नाही. मात्र,बी. प्रभाकरन यांच्या नेतृत्वात त्रिवेणी अर्थमुव्हर्सने सुरजागड येथे पाय ठेऊन उद्योग उभारण्याची हिंमत केली. अनेक समस्या आल्या. जिवे मारण्याच्या धमक्या अजुनही येत असतात. पण जिवापेक्षा जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य देणे हेच इथला भूमिपुत्र म्हणून माझे कर्तव्य आहे , असेही ते म्हणाले. सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे होऊ घातलेल्या प्रभू श्रीरामचंद्राचा मंदिराच्या लोकार्पणाचा संदर्भ देत म्हणाले की, रामायण काळात महाकांतार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडीशा भागातील दंडकारण्यात वसलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आजवर कुणालाच उद्योग उभारणे शक्य झाले नाही. पण तिकडे राममंदिराची उभारणी होत असताना इकडे जिल्ह्यात पोलाद उद्योगाची उभारणी होणे म्हणजे लॉयड्स मेटल्सचे मॅनेजिंग डायरेक्टर बालसुभ्रमण्यम प्रभाकरन यांना प्रभू श्रीरामचंद्राने दिलेला आशीर्वादच होय. खासदार अशोक नेते यांनी गडचिरोली प्रेस क्लबने प्रभाकरन यांना दिलेला पुरस्काराने खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा गौरव आहे, असे म्हटले. याप्रसंगी आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रेस क्लबचे उपाध्यक्ष अनिल धामोडे यांनी केले. संचालन मिलिंद उमरे, तर आभार सचिव नीलेश पटले यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रेस क्लबचे कोषाध्यक्ष अविनाश भांडेकर, सहसचिव रूपराज वाकोडे, सदस्य सुरेश पद्मशाली, रोहिदास राऊत, सुरेश नगराळे, शेमदेव चाफले, विलास दशमुखे, मनोज ताजने आदींनी सहकार्य केले. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*उघडले उद्योगाचे महाद्वार…*
लॉयड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर बालसुब्रमण्यम प्रभाकरन यांच्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात उद्योगाचे महाद्वार उघडले गेले आहे. या महाद्वारातून अदानी, जिंदल व इतर अनेक दिग्गज व्यावसायिक जिल्ह्यात येतील आणि हा जिल्हा उद्योग क्षेत्राच्या शिखरावर तेजस्वी ताऱ्यासारखा चमकेल, असे मत कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी व्यक्त केले.
———————-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button