झाडीपट्टीतील रंगभूमी कलाकार परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार

नवी दिल्ली: देशाच्या 74 व्या प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर आज पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून गडचिरोली जिल्हयातील झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे यांच्यासह 106 जणांचा पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे
केंद्र सरकारने आज पद्म पुरस्कारांची घोषणा केली. त्यामध्ये सहा पद्मविभूषण, नऊ पद्मभूषण आणि 91 जणांना पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. ओआरएसचे निर्माता दिलीप महालनोबिस यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तर महाराष्ट्रातून एक नाव या यादीत आहे, ते म्हणजे परशुराम खुणे. परशुराम खुणे हे झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार असून त्यांनी आतापर्यंत 800 हून अधिक नाटकांमध्ये काम केलंय.
परशुराम खुणे यांनी अनेक नक्षलवादी तरुणांना हिंसा सोडून मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं आहे. हा पुरस्कार म्हणजे गेल्या 50 वर्षाच्या कामाचं फलित असून हा पुरस्कार झाडीपट्टी रंगभूमीच्या रसिकांना अर्पण करत असल्याची प्रतिक्रिया परशुराम खुणे यांनी दिली.