* आर्थिक फसवणूक केल्याबद्दल चंद्रशेखर भडांगे यांचेविरूद्ध पोलीसांत तक्रार दाखल*

गडचिरोली – आर्थिक फसवणूक केल्याबद्दल चंद्रशेखर भडांगे यांचेविरूद्ध भादवी कलमाप्रमाणे व जेष्ठ नागरिक संरक्षण कायद्यांन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी तक्रार जेष्ठ पत्रकार सुरेश पद्मशाली यांनी पोलीस अधिक्षक गडचिरोली यांचेकडे दाखल केली आहे.
सुरेश पद्मशाली यांनी पोलीस अधिक्षक गडचिरोली यांचेकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पोलीस स्टेशन मागे असलेल्या माझ्या प्लाॕटवर दुकान गाळे काढण्याचा सल्ला भडांगे यांनी दिला व हे दुकान गाळे प्रत्येकी २० ते २५ लाख रूपये प्रमाणे विकून देतो अशी हमी दिली. मी त्यांचेवर विश्वास ठेवून बांधकाम करण्यास तयार झालो. सुरूवातीला २ गाळे बांधण्याचे ठरविण्यात आले. हे २ गाळे प्रत्येकी २० लाख रू.प्रमाणे मला द्या मीच ठेवतो असे भडांगे म्हणाले, त्यास मी होकार दिला व आणखी गाळे विकून देणार असल्यास आणखी २ गाळे काढावे असे सुचविले. त्यावर भडांगे यांनी २ गाळे मी विकत घेतो व २ गाळे विकून देतो असे आश्वासन दिल्यावरून ४ गाळ्यांचे बांधकाम सुरू करण्यात आले. नोव्हेंबर २०२० पासून सुरू करण्यात आलेले बांधकाम जून २०२१ पर्यंत स्लब टाकून व शटर लावून अर्धवट करण्यात आले. आतील भिंती, प्लास्टर, व टाईल्स लावणे बाकी ठेवले तसेच वरच्या मजल्यावर जाण्याचा जीना पायऱ्या, संडास बाथरूम चे काम केले नाही. उर्वरीत कामासाठी भडांगे यांनी आणखी पैसे मागितले असता त्यांचेवर विश्वास ठेवून मी आणखी पैसे दिले. अशाप्रकारे दि.२५-११-२०२० ते १४-६-२१ पर्यंत भडांगे यांना नगदी व चेकव्दारे एकुण १७ लाख ५३ हजार रूपये देण्यात आले. आपण घेणार असलेले २ गाळे पुर्ण करून मला ४० लाख रूपये द्यावे असा तगादा लावला असता भडांगे यांनी टाळाटाळ केली व मार्च मध्ये २०२२ मध्ये माझे बील निघणार आहे तेंव्हा मी पुर्ण पैसे देतो व बांधकाम पुर्ण करून देतो असे सांगितले. मार्च नंतर भडांगे यांनी गाळ्यांचे पैसेही दिले नाही अर्धवट बांधकामही पुर्ण केले नाही. बोलणे व फोन उचलणे बंद केले. ३ नोव्हेंबर २०२२ ला भडांगे यांना व्हाटसअप वरून “उर्वरीत काम करून द्या ” असा मेसेज पाठविला असता “आपल्या बांधकामास परवानगी घ्यावी मी ते लगेच घेण्यास तयार आहे” असे व्हाटसअप वरून उत्तर दिले. ५ नोव्हेंबर ला पुन्हा “थोडा धीर धरा ! तुमच्या संपूर्ण बांधकामासाठी निश्चित विक्रीचा प्रयत्न सुरू आहे” असे कळविले. ८ नोव्हेंबर ला मी त्यांना , मी अडचणीत आहे कृपया मनस्ताप देऊ नका असा मेसेज पाठविला असता, “मनस्ताप करून घेण्याची गरज नाही उर्वरीत काम केले जाईल ” असे भडांगे यांनी कळविले. परंतु प्रत्यक्षात काहीही केले नाही. केवळ १० लाख किंमतीचे काम करून १७ लाख ५३ हजार रूपये लुबाडले.
सुरेश पद्मशाली यांनी शेवटी तक्रारीत म्हटले आहे की, मी ६९ वर्षीय जेष्ठ नागरिक आहे. भडांगे यांनी पैसे कमविण्याचे आमिष दाखवून माझी आर्थिक फसवणूक केली आहे व मला मानसिक त्रास देवून माझ्या जिविताला धोका निर्माण केला आहे त्यामुळेच भडांगे यांचेविरूद्ध भा.द.वि. कलमान्वये व जेष्ठ नागरिक संरक्षण कायद्यांन्वये गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी अशी विनंती सुरेश पद्मशाली यांनी पोलीस अधिक्षक गडचिरोली यांचेकडे केली आहे.