*59 महसूल मंडळांत ‘महाराजस्व समाधान शिबिर; ‘एकाच ठिकाणी मिळणार सर्व लाभ’ : संधीचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन*

गडचिरोली दि.4 मार्च : सर्वसामान्यांचे प्रश्न स्थानिक पातळीवरच निकाली काढण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचा पहिला टप्पा राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकूण ५९ महसूल मंडळांमध्ये हे अभियान पार पडणार असून, नागरिकांनी आपल्या अडचणी सोडवण्यासाठी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज पत्रकार परिषदेतून केले.
जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, महसूल प्रशासनाने या अभियानाचे सुटसुटीत नियोजन केले असून, सर्व तालुक्यांमध्ये ७ मार्चपासून या शिबिरांना सुरुवात होणार आहे. त्यानंतर १४ मार्च, १० एप्रिल, १७ एप्रिल, २४ एप्रिल, ८ मे, १५ मे या नियोजित तारखांना महसूल मंडळनिहाय ठिकठिकाणी ही शिबिरे आयोजित केली जातील. विशेषतः धानोरा आणि एटापल्ली या तालुक्यांचा भौगोलिक विस्तार मोठा असून तिथे सहापेक्षा जास्त महसूल मंडळे आहेत. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने या दोन तालुक्यांसाठी अतिरिक्त शिबिराचे आयोजन केले आहे, जेणेकरून दुर्गम भागातील एकही नागरिक लाभापासून वंचित राहणार नाही.
या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट ‘एकाच ठिकाणी सर्व लाभ’ देणे हे आहे. यामध्ये महसूल विभागाशी संबंधित सातबारा दुरुस्ती, फेरफार नोंदी, विविध प्रकारचे दाखले (उत्पन्न, जात, अधिवास), रेशन कार्डाशी संबंधित कामे आणि संजय गांधी निराधार योजनेसारख्या कल्याणकारी योजनांचे अर्ज जागीच निकाली काढले जाणार आहेत. जिल्हाधिकारी पंडा यांनी स्पष्ट केले की, अनेकदा तांत्रिक कारणांमुळे किंवा माहितीच्या अभावामुळे नागरिकांची कामे प्रलंबित राहतात. ही शिबिरे अशा सर्व अडचणी दूर करून पारदर्शक पद्धतीने सेवा देण्यासाठी आयोजित केली आहेत.
“प्रशासन स्वतःहून जनतेपर्यंत पोहोचत आहे, ही नागरिकांसाठी मोठी संधी आहे. आपल्या गावाजवळील महसूल मंडळात होणाऱ्या या शिबिरामध्ये, आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे,” असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. पंडा यांनी केले आहे.
000


