*शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंतच्या पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ : सवलतीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन*

गडचिरोली दि.३:
महाराष्ट्र शासनाने नवीन वर्षाच्या मुहूर्तावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. महसूल व वन विभागाने १ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या विशेष राजपत्रातील आदेशानुसार, शेतकऱ्यांनी घेतलेल्या २ लाख रुपयांपर्यंतच्या शेती किंवा पीक कर्जाशी संबंधित सर्व कायदेशीर कागदपत्रांवरील मुद्रांक शुल्क आता पूर्णतः माफ करण्यात आले आहे. हा निर्णय १ जानेवारी २०२६ पासूनच लागू झाला आहे
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी लागणारे विविध करारनामे, हक्कविलेख निक्षेप, तारण गहाणखत, हमी पत्र, गहाणाचे सूचनापत्र किंवा घोषणापत्र यांसारख्या कोणत्याही संलेखावर आता मुद्रांक शुल्क भरावा लागणार नाही. या सवलतीचा लाभ प्रामुख्याने पीक कर्ज घेणाऱ्या अल्पभूधारक व गरजू शेतकऱ्यांना होणार असून, कर्ज प्रक्रियेत येणारा अतिरिक्त आर्थिक खर्च यामुळे वाचणार आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना या सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. शासनाचा हा निर्णय कृषी क्षेत्राला बळकटी देणारा असून शेतकऱ्यांनी आपल्या पीक कर्ज प्रकरणांसाठी या योजनेचा फायदा घ्यावा, असे त्यांनी नमूद केले आहे



