*नागरिकांपर्यंत लोकसेवा हक्क कायद्याची माहिती पोहोचवा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन*

*सेवा हक्क दिनानिमित्त 12 आदर्श ‘आपले सरकार’ केंद्रांचे उद्घाटन*
गडचिरोली, दि. 28 : “नागरिकांना सुलभ, पारदर्शक व वेळेत सेवा देणे ही आपली जबाबदारी आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या माध्यमातून सेवा देण्याची आपणास संधी मिळाली आहे. या कायद्याची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवून जिल्ह्यात लोकसेवा हक्क कायद्याची जागृती करा,” असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज प्रशासकीय यंत्रणेला केले.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीची “दशकपूर्ती” व “प्रथम सेवा हक्क दिन” या निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवा हक्क दिनाची शपथ दिली.
उपजिल्हाधिकारी प्रसेनजित प्रधान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) एस. एम. शेलार, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार (व्हीसीद्वारे), तहसीलदार सुरेंद्र दांडेकर, तहसीलदार मोहनिश शेलवटकर, नायब तहसीलदार ओसिन मडकाम यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेवा हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते 12 आदर्श ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. यात अहेरी पंचायत समिती अंतर्गत आलापल्ली, नागेपल्ली व रेपनपल्ली, आरमोरीतील वैरागड, चामोर्शीतून कुनघाडा (रा.), आष्टी, घोट व विसापूर (रा.), देसाईगंजमधील मुरखडा, आणि मुलचेरा पंचायत समितीतील विवेकानंदपूर व सुंदरनगर येथील सेवा केंद्रांचा समावेश आहे.
राज्य शासनाने 28 एप्रिल हा ‘सेवा हक्क दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निमित्ताने जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषदा व नगर पंचायतांच्या कार्यक्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले.