नक्षल्यांनी केली आदिवासी इसमाची गळा दाबून हत्त्या

गडचिरोली,ता.३०: नक्षल्यांनी शनिवारी(ता.२९)रात्री भामरागड तालुक्यातील धोडराज पोलिस ठाण्यांतर्गत जुव्वी गावातील एका प्रतिष्ठित इसमाची गळा दाबून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पुसू गेब्बा पुंगाटी(६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
शनिवारी रात्री नक्षली जुव्वी येथील पुसू पुंगाटी यांच्या घरी गेले. त्यांनी पुसू यांना झोपेतून उठवून गावाबाहेर नेले आणि टॉवेलने गळा दाबून त्यांची हत्या केली. पुसू पुंगाटी हे गावातील प्रतिष्ठीत नागरिक होते. त्यांना पत्नी आणि दोन विवाहित मुले आहेत. मोठा मुलगा चिन्ना पुंगाटी हा एटापल्ली येथील राजे धर्मराव महाविद्यालयात प्राध्यापक, तर लहान मुलगा किशोर पुंगाटी हा अहेरी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करतो. प्रा.चिन्ना पुंगाटी यांची पत्नी पोलिस शिपाई आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जात पुसू पुंगाटी यांनी दोन्ही मुलांना उच्चशिक्षित केले. मात्र, नक्षल्यांनी त्यांची काल हत्या केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. पुसू पुंगाटी यांचा नक्षली वा पोलिसांशी काहीही संबंध नव्हता. तरीही त्यांची हत्या करण्यात आली. घटनास्थळी कुठलेही पत्रक किंवा बॅनर आढळले नाही. त्यामुळे हत्या नक्षल्यांनी केली की अन्य कुणी, याबाबत तपास सुरु आहे. मात्र, नक्षल्यांनी हत्या केल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.
यंदा १ फेब्रुवारीला नक्षल्यांनी भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम मडावी यांची हत्या केली होती. त्यानंतर काल पुसू पुंगाटी यांची हत्या केल्याने खळबळ माजली आहे.