गडचिरोली प्रिमियर लीगचा आज १९ मार्चला समारोप, प्रख्यात गायक सोनू निगम यांच्या संगीत रजनीची मेजवानी
गडचिरोली,ता.१८: लॉयड मेटल्स अँड इंडस्ट्री लिमिटेडच्या वतीने आयोजित गडचिरोली प्रिमियर लीग निमित्त बॉलीवूडचे प्रख्यात गायक सोनू निगम यांचा संगीत रजनीचा कार्यक्रम १९ मार्चला रात्री ८ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
लोह उद्योग आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या लॉयड्स मेटल्स अॅंड एनर्जी लिमिटेड कंपनीतर्फे गडचिरोलीसारखया मागास जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी यासाठी यंदा प्रथमच गडचिरोली प्रिमियर लीगचे आयोजन करण्यात आले. ५ फेब्रुवारीला भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्या हस्ते या सामन्यांचे उद्घाटन झाले. तेव्हापासून क्रिकेटप्रेमींनी सामन्यांचा आनंद लुटला. आता १९ मार्चला दुपारी ४ वाजता गडचिरोली हरिकॉन्स विरुद्ध गडचिरोली कमांडो पोलिस या संघांमध्ये अंतिम सामना होणार असून, रात्री ७.३० वाजता विजेता संघ आणि उत्कृष्ट खेळाडूंना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
त्यानंतर प्रख्यात गायक सोनू निगम यांचा संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे. गडचिरोली शहरात प्रथमच होणारा हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला सहपालकमंत्री अॅड.आशिष जयस्वाल, खा.डॉ.नामदेव किरसान, माजी मंत्री,आ.धर्मरावबाबा आत्राम, आ.डॉ.मिलिंद नरोटे, आ.रामदास मसराम, लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे प्रबंध संचालक बी.प्रभाकरन उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम यूट्यूबवर लाईव्ह दाखविण्यात येणार आहे. गडचिरोलीच्या जनतेचा उत्साह आणि एकतेचा परिचय करुन देणारा हा कार्यक्रम असून, या ऐतिहासिक कार्यक्रमाचा नागरिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने केले आहे.