जगन्मान्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर

जगन्मान्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर
– हिरालाल पगडाल, संगमनेर,९८५०१३०६२१
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने एक ग्लोबल सर्व्हे केला आहे. हा सर्व्हे “The makers of the universe ” या नावाने करण्यात आला. त्यात गेल्या दहा हजार वर्षात जगाला आकार देणाऱ्या प्रमुख मानवतावादी व्यक्तींचा शोध घेण्यात आला. या सर्व्हेनुसार पहिल्या १०० नावांच्या यादीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे.
२००४ साली कोलंबिया युनिव्हर्सिटीने जगातील शंभर हुषार (स्कॉलर) व्यक्तींची यादी केली होती,त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव प्रथम क्रमांकावर आहे.
जगात सर्वाधिक पुतळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे उभारण्यात आले आहेत आणि जगात सर्वाधिक जयंती ज्या महापुरुषाची साजरी केली जाते तो महापुरुष आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
ब्रिटिश कोलंबिया या देशाने या वर्षांपासून १४ एप्रिल हा बाबासाहेबांचा जन्म दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे.
या वरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जगन्मान्य आहेत. आपल्या सहज लक्षात येईल.
भारतात हजारो वर्षांपासून जातीय उच्चनिचता ,अस्पृश्यता, विषम समाज व्यवस्था अस्तित्वात आहे. ती कमी व्हावी यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आहेत हेही सत्य आहे. एकोणिसाव्या शतकात सुधारकांनी देखील त्या दिशेने प्रयत्न केले, त्यांनी उदारपणे मानवतावादी दृष्टिकोनातून अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य माणसालाच या व्यवस्थेच्या विरोधात उभे केले. त्यांचा आत्मसन्मान जागा केला, त्यांना संघटीत केले. अस्पृश्यांनी या विषम समाजव्यवस्थेविरुद्ध केलेले बंड आणि स्पृश्य सुधारकांनी हि विषमता नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न एकाचवेळी झाले आणि हि विषमताग्रस्त व्यवस्था मोठ्या प्रमाणावर शिथिल झाली .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले होते. त्यांनी शिका,संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दलितांना दिला.
बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला, कवी वामन कर्डक म्हणतात
‘ महाड क्रांतीमधी , दिलं मर्दाच जीण ।
स्वतःच्या ओंजळीनं ,शिकविलं पाणी पिण ।।”
बाबासाहेब व त्यांच्या हजारो अस्पृश्य अनुयायांनी त्या दिवशी चवदार तळ्यात उतरून स्वतःच्या ओंजळीने पाणी पिण्याचा हक्क बजावला. त्यावेळी त्यांच्या सोबत निवडक स्पृश्य प्रतिनिधी देखील होते. सनातनमतवाद्यांनी प्रचंड विरोध केला,लाठ्या काठ्या घेऊन अस्पृश्यांवर हल्ला केला,दंगल घडवून आणली पण बाबासाहेब आणि त्यांचे अनुयायी डगमगले नाहीत. पिण्याच्या पाण्यासाठी जगात झालेला हा पहिला सत्याग्रह होता. धर्म मार्तंडांनी गोमूत्र आणि गाईचे शेण टाकून तळे पवित्र करण्याचा विधी केला.’माणसांचा स्पर्शामुळे तळे अपवित्र होते आणि उत्सर्जन प्रक्रियेतून बाहेर पडणारे मलमूत्र टाकून तळे शुध्द होते’ यांवर जगभरातून प्रचंड टीका झाली.
चवदार तळ्याच्या सत्त्याग्रहानंतर बाबासाहेबांनी महाडलाच हजारो अनुयांच्या उपस्थितीत २५ डिसेंबर१९२७ रोजी मनुस्मृतीचे जाहीर दहन केले. ही एक असामान्य घटना होती, मनुस्मृतीमुळे वर्णाश्रम व्यवस्थेनुसार उच्च वर्णीयांना विशेषाधीकार बहाल केलेले होते,आणि शूद्रांना पशुतुल्य जीणे जगायला भाग पाडले होते. त्याला नकार देणारे हे आंदोलन होते. मनुस्मृती नाकारणे म्हणजे एक प्रकारचे अनोखे धार्मिक कायदेभंग आंदोलन होते. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना मेलेली जनावरे ओढू नका, मेलेल्या जनावरांचे मांस खाऊ नका,येसकरी करू नका, चांगले कपडे घाला असा आदेश दिला. त्याचे पालन कोट्यावधी दलीतांनी केले. त्यामुळे मेलेल्या जनावरांची विल्हेवाट लावण्याची पाळी स्पृश्यांवर आली.
अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश नव्हता, त्या विरोधात नाशिकच्या काळाराम मंदिरात १९३० ते १९३४ सलग पाच वर्षे मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह झाला, पण स्पृश्य आणि सनातन मंडळींच्या भूमिकेत बदल झाला नाही, त्यांच्या हृदयाला पाझर फुटला नाही, यांमुळे बाबासाहेब व्यथित झाले, त्यांनी मार्च१९३४ मध्ये काळाराम मंदिर सत्याग्रह मागे घ्यायला सांगितले. त्या नंतर २३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील येथे एक परिषद घेतली. “स्पृश्य आणि सनातन मंडळींच्या भूमिकेत बदल होईल, ते अस्पृश्यांचे माणूस म्हणून जे अधिकार आहेत ते मान्य करतील अशी आशा होती. त्यासाठी आम्ही खूप वाट पाहिली पण आमची निराशा झाली,आता या धर्मात अस्पृश्यांना न्याय मिळण्याची शक्यता दिसत नाही”, असे बाबासाहेबांनी स्पष्ट केले. त्या नंतर बाबासाहेबांनी ” मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही.” हि ऐतिहासिक घोषणा केली. एक प्रकारे हा हिंदू धर्म मार्तंडांना इशारा होता, या इशाऱ्याची दखल घेऊन अस्पृश्यांचे मानवी हक्क मान्य करण्याची धर्म मार्तंडांना संधी होती.
याच दरम्यान गोलमेज परिषदा पार पडल्या .त्या अपयशी झाल्या. त्यानंतर ब्रिटिश पंतप्रधान रॅम्स मॅकडेनॉल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला, त्यात मुस्लीम, ख्रिश्चन, शीख यांच्या प्रमाणेच अस्पृश्यांसाठी विभक्त मतदार संघाची मागणी मान्य झाली. हा हिंदू मध्ये फाटाफूट करण्याचा प्रयत्न आहे असा आरोप करून म.गांधी आणि काँग्रेसने हा निवाडा फेटाळला, म.गांधींनी पुण्यात येरवडा जेल मध्ये अस्पृश्यांसाठी विभक्त मतदार संघ तरतुदी विरोधात आमरण उपोषण सुरू केले. देशभर तणावग्रस्त वातावरण तयार झाले. बापूंचे प्राण वाचवा म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेवर दबाव वाढला, शेवटी नाईलाजास्तव बाबासाहेब तडजोडीला तयार झाले. गांधीजी आणि बाबासाहेब यांच्यात पुणे करार झाला. अस्पृश्यांसाठी विभक्त मतदार संघाऐवजी राखीव मतदारसंघ मान्य करण्यात आले.
पुणे करार बद्दल अनेकांची उलट सुलट मते आहेत,भारत स्वतंत्र झाल्यावर नव्या संविधानात मुस्लिम, ख्रिस्ती, शीख यांच्यासाठी यां पूर्वी असलेली विभक्त मतदारसंघाची तरतूद संपुष्टात आली, परंतु अस्पृश्य व आदिवासी यांच्यासाठी राखीव मतदार संघाची तरतूद कायम ठेवली गेली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. त्यांनी महत्प्रयासाने तयार केलेल्या संविधानानुसार अस्पृश्यता हा दंडनीय अपराध ठरवण्यात आला. नव्या संविधानाने अस्पृश्य आणि आदिवासी यांच्या कल्याणासाठी अनेक उपाय योजना केल्या. यांमुळे भारतात सामाजिक विषमता कमी होत चालली आहे. व्यवहारातली अस्पृश्यता कायद्याने संपुष्टात आली. मनातली अस्पृश्यता घालवणे हे अजूनही मोठे आव्हान आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू महिलांसाठी, मग त्या स्पृश्य असोत वा अस्पृश्य खूप महान कार्य करून ठेवलेले आहे. त्यांनी स्वतंत्र भारताचे विधी व न्याय मंत्री या नात्याने हिंदू कोड बिलाचा मसुदा संसदेत मांडला. त्याच्या आग्रहासाठी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पुढे याच बीलानुसार द्विभार्या प्रतिबंध, घटस्फोट, पोटगी, स्त्रीधन, दत्तक व वारसाहक्क आदी कायदे झाले आणि हिंदू महिलांना खूप मोठी सुरक्षा मिळाली. हे कायदे नसते तर हिंदू महिलांचे काय झाले असते असा विचार केला तर काळजात एकदम चर्रर्र होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जगन्मान्य अर्थ शास्त्रज्ञ होते, नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थतज्ञ डॉ.अमर्त्य सेन यांनी त्यांना फादर ऑफ द इकॉनॉमिक्स असे संबोधले. मजूर मंत्री या नात्याने त्यांनी स्रियांना भरपगारी प्रसूती रजा लागू केली, एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची निर्मिती केली. अलीकडे नदीजोड प्रकल्पाची जोरदार चर्चा सुरू आहे,ही कल्पना त्यांनी नव्वद वर्षांपूर्वी मांडून दामोदर खोरे प्रकल्पाचे प्रारूप तयार केले होते.
१९३५ साली येवल्याला धर्मांतराचे सूतोवाच करणाऱ्या बाबासाहेबांनी १९५६ पर्यंत वाट पाहिली परंतु धर्म मार्तंड बधले नाहीत आणि बदलले नाहीत.शेवटी त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौध्द धर्माचा स्वीकार करण्याचे ठरवले. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी ,दसऱ्याच्या दिवशी नागपूरच्या दीक्षाभूमीवर आपल्या साडे आठ लाख अनुयायांच्या उपस्थितीत त्यांच्यासह धर्मांतर करून बौध्द धम्म दिक्षा घेतली आणि अनोखे सीमोल्लंघन केले.
जगाच्या पाठीवर एव्हढ्या मोठ्या संख्येने एकाचवेळी धर्मांतर प्रथमच घडले. बाबासाहेब बुध्दाला शरण गेले आणि त्यांनी प्रज्ञा, शील ,करुणेचा बौध्दधर्म स्वीकारला. या घटनेने भारतीय विषम समाज व्यवस्थेवर भीम टोला घातला गेला. देशातील कोट्यवधी अस्पृश्य माणसांनी बौध्द धर्म स्वीकारला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांना दिर्घ आयुष्य लाभले नाही, धम्म दिक्षेनंतर अवघ्या ५३ व्या दिवशी म्हणजेच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे पुढची लढाई राहून गेली. ती राहिलेली लढाई आपल्याला लढायची आहे. जातीविहिन,वर्गविहिन समाज निर्मिती करायची आहे. सर्व माणसांचा आत्मसन्मान राहील अशी व्यवस्था निर्माण करायची आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने त्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार आपल्याला करायचा आहे, तेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना खरे अभिवादन ठरेल.
– हिरालाल पगडाल, संगमनेर,९८५०१३०६२१