*पूरपरिस्थितीत बचाव कार्याचे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल मार्फत प्रात्यक्षिक*
*वैनगंगा नदीपात्रात कोटगल येथे सराव कार्यक्रम संपन्न*
गडचिरोली, दि. ४ एप्रिल :
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), नागपूर यांच्या पथकाद्वारे गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थितीतील बचाव कार्याचे विशेष प्रात्यक्षिक आणि सराव कार्यक्रम कोटगल बॅरेज, वैनगंगा नदीमध्ये यशस्वीपणे पार पडले. जिल्ह्यात १ ते ११ एप्रिल २०२५ दरम्यान राबवण्यात येणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन जनजागृती व सराव कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी (दि. ४ एप्रिल) सकाळी हे विशेष जलप्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षणामध्ये कुरखेडा, कोरची, आरमोरी, देसाईगंज तालुक्यांतील स्थानिक बोटचालक तसेच विविध विभागातील बचाव पथक सदस्यांना पूरपरिस्थितीत योग्य प्रतिसाद देण्यासंबंधी प्रत्यक्ष कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. बोट हँडलिंग, बोट ऑपरेटिंग, पूरपाण्यात अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षितपणे बाहेर काढणे, त्यांना CPR (सिपीआर) देऊन प्रथमोपचार कसे करावेत, दोरीचा वापर करून बचाव, घरगुती साहित्यापासून बचाव साधने तयार करणे, पोहण्याचे तंत्र आणि गाठी बांधण्याचे प्रकार अशा विविध महत्त्वपूर्ण बाबी या प्रशिक्षणात शिकवण्यात आल्या.
या प्रात्यक्षिकात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, NDRF पुणे पथकाचे डेप्युटी कमांडन्ट प्रमोद कुमार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे, NDRF नागपूरचे पोलीस निरीक्षक ब्रिजेशकुमार यादव, तहसीलदार सुरेंद्र दांडेकर, नायब तहसीलदार ईश्वर राऊत, लेखाधिकारी रमेश मडावी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रशिक्षणात कोरची, कुरखेडा, आरमोरी, देसाईगंज व गडचिरोली तालुक्यांतील महसूल, पोलीस, आरोग्य, महावितरण विभागातील बचाव पथक, स्थानिक पोलिस कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, आपदा मित्र तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कार्यक्रमात सहायक महसूल अधिकारी स्वप्निल माटे, आपदा मित्र चंद्रशेखर मोलंगुरवार, कल्पक चौधरी, अजित नरोटे व मयूर किन्नाके यांची विशेष उपस्थिती होती.