‘फुले’ चित्रपट अन् फुले-आंबेडकरांची स्मृती!

‘फुले’ चित्रपट अन् फुले-आंबेडकरांची स्मृती!
“पुण्यात जातीअंतासाठी लोक ‘एकता मिसळ’च्या माध्यमातून एकत्र येत असताना ब्राह्मण महिलांनी ‘जय परशुरामा’च्या घोषणा देत ‘फुले’ चित्रपटाला विरोध केलाय. याच महात्म्यानं महिलांच्या हाती पाटी पेन्सिल दिली. कुमारीमातांचा प्रश्न सोडवला, विधवांचं केशवपन रोखण्यासाठी नाभिकांचा संप घडवला. त्याच ब्राह्मण महिला महात्मा फुले यांच्या जीवनावरील चित्रपटाविरोधात निदर्शनं करताहेत. फुले-आंबेडकर या गुरूशिष्याच्या विचारांचे धिंडवडे काढलेत. सध्याचा काळ मोठा विचित्र आहे. जे गाडण्यासारखं आहे ते मिरवलं जातंय अन् मिरवावं ते दडवलं जातंय. एकीकडे सुधारणेचा आव अन् दुसरीकडे देवाला नवस, हे ढोंग आहे. अशा ढोंगी व्यक्तींकडून सामाजिक सुधारणा होण्याची सुतराम शक्यता नाही. अशा समाजाला फुले-आंबेडकर कळलेच नाहीत!”
————————————————-
परवा शुक्रवारी महात्मा फुले यांची जयंती होती आणि उद्या सोमवारी डॉ.आंबेडकर यांची जयंती आहे. त्यांच्या स्मृतिस्थळावर नेहमीप्रमाणे त्यांच्या भक्तांची वर्दळ दिसून येते. ज्या जातीअंताचा मूर्तीभंजनाचा ध्यास या दोघांनी घेतला, त्यांच्याच विचाराला हरताळ फासला जातोय. त्यांच्या मूळ विचारांपासून दूर गेलेल्यांना त्या विचारांची निदान आठवण व्हावी असा या स्मृतिदिनामागचा हेतू, पण त्याचाच विसर पडलेला जाणवतो. सामाजिक विषमता, धर्मांधता विरोधात रान पेटविण्यासाठी सिद्ध व्हायला हवंय अशी सध्याची स्थिती असताना त्यांच्या विचारांचे पाईक मात्र निद्रिस्तावस्थेत आहेत. सामाजिक समतेची लढाई ही नेहमीच समाजाची मानसिक उंची वाढविणारी ठरलीय. या समतेच्या लढाईत अस्पृश्यतेची खांडोळी झालीय, वर्णाभिमान धुडकावला गेलाय. जातीयतेला चाप बसलाय, स्त्रिया स्वयंसिद्ध झाल्यात, परंतु हे परिवर्तन हिंदुधर्माचा शक्तिपात करणाऱ्या जातीसंस्थेचा नायनाट करणारं ठरलं नाही. जातीअंताची लढाई ही स्वार्थसाधकांच्या हातात गेल्यानं ती जातीअंताची न राहता जाती अहंकाराची झालीय! विशेष म्हणजे ही लढाई सामाजिक समतेचा आग्रह धरणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नावं घेत लढली जातेय, ही हरामखोरी आहे. ती नेत्यांप्रमाणे त्यांच्या अनुयायांनीही आत्मसात केलीय. खरंतर त्यांनी त्या सोंगाढोंगावर तुटून पडण्याचं काम करायला हवंय. भारतीय राज्य घटनेनं जातीयता नष्ट करण्याचा आग्रह धरलेला आहे. मात्र त्याचाच आधार घेत जातीच्या संघटना उभारल्यात. त्याच्या भिंती अधिक घट्ट केल्यात. शासकांनी आणि राजकारण्यांनी याच जाती संघटनांचा आधार घेतलाय. सत्तेसाठी अन् मिळालेली सत्ता टिकविण्यासाठी सोशल इंजिनिअरिंगच्या नावाखाली जाती अहंकार माजविलाय. असत्य, अन्याय, भ्रष्टाचार, अपमार यांच्याविरोधासाठीच नव्हे, तर सत्याच्या आग्रहासाठी आणि हक्काच्या, मानाच्या पानासाठीही माणसं एकत्र येऊ शकत नाहीत. इतकी जाती, प्रदेश, भाषा, पक्ष याच्या अभिनिवेशानं अहंकारात तुटलेली, फुटलेली, विखुरलेली आहेत. या स्वार्थी तुटीफुटीवर प्रकाश टाकावा आणि अवघा समाज एकवटावा या अपेक्षेनं फुले आणि आंबेडकर यांना मानणाऱ्यांकडून प्रयत्न व्हायला हवंय. जातीयतेचा नायनाटासाठी समाजसुधारकांनी आपल्या आयुष्याची राखरांगोळी केलीय. स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्यांनी ती विभूती मानली. पुरोगाम्यांकडे सामाजिक समतेचं चांगलं बियाणं होतं पण ते त्यांनी आपसातल्या भांडणात रुजण्यापूर्वीच सडवलं, म्हणूनच जातीयवादी पक्ष-संघटनांचं निवडुंग आज फोफावलंय. आत्मनाशी आणि कार्यनाशी यात फरक करणाऱ्यांची तशी गरज नाही. जातीचा अहंकार आणि अस्मिता हुंडारत हुंदडणारे सगळे मनुवादी आहेत. त्यांना स्वार्थासाठी मनुची जातीय मांडणी हवीच असते.
फुले आणि आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांचे विचार स्वीकारणं, रुजवणं, वाढवणं आणि मानव्याला जे अनिष्ट ते नष्ट करण्यासाठी त्याचा वापर करणं हाच फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांचा सार्थ गौरव आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी फुले अन् आंबेडकर यांचा विचार करण्या, सरसावल्यांनी जातीअंताचा तो विचार कधीच गुंडाळून ठेवलाय. सध्याचा काळ मोठा विचित्र आहे. जे गाडण्यासारखं आहे ते मिरवलं जातंय आणि मिरवावं ते दडवलं जातंय. दिवसेंदिवस देवाला मानणाऱ्यांची संख्या, देवादिकांचे स्तोम कमी करण्याऐवजी वाढतंच आहे. अशा समाजाला महात्मा फुले, डॉ. आंबेडकर कळाले ना त्यांची बहुजन समाजाची चळवळ कळली! कारण ‘बहुजन’ या शब्दाचा अर्थच कळला नाही. काहींनी ‘बहुजन’ या शब्दाचा सोयीचा अर्थ लावून फुले-आंबेडकरांचा, त्यांच्या चळवळींचा आपल्या सोयीसाठी, स्वार्थासाठी, राजकारणात तरून जाण्यासाठी वापर केलाय. त्यांना आपल्या जातीची, स्वार्थाची, राजकारणाची चिंता आहे. फुले-आंबेडकर यांच्या विचारांचं त्यांना सोयर सुतक नाही. फुले- आंबेडकरांचा विचार हा केवळ माणसांनाच नव्हे तर, राष्ट्राला समर्थ बनवणारा आहे. भारतातल्या सामाजिक विकासाची बीजंही फुले-आंबेडकरांच्या या सामाजिक क्रान्तीत आहेत. स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण, आरोग्यविषयक सेवाकार्य, सामाजिक-आर्थिक समानता, श्रममूल्यांचा पुरस्कार यासारखे उत्क्रांतीकारक विषय फुले-आंबेडकर यांच्या विचारात सामावलेलेत. आजही सामाजिक सुधारणांचे निर्णय सरकार घेतं, तेव्हा होणाऱ्या चर्चेचं दुसरं टोक हे फुले-आंबेडकर यांच्या विचारांचं असतं. हे विचार पेलवण्याचं, समाजाच्या, सत्ताधीशांच्या गळी उतरवण्याचं सामर्थ्य केवळ छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.आंबेडकर यांनी दाखवलं. महात्मा फुले यांच्या निधनानंतर क्षीण झालेली सत्यशोधक समाजाची चळवळ शाहू महाराजांनी समर्थ केली. परंतु अतिरेकी शिवराळपणा यामुळं ही चळवळ ब्राह्मण्याकडून ब्राह्मणांकडे सरकली आणि ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात फसली. या मोडीत निघालेल्या चळवळीला डॉ.आंबेडकरांनी स्वतःला महात्मा फुले यांचे अनुयायी मानल्यामुळे जीवनदानाबरोबरच व्यापकता मिळाली. आज या चळवळीची, फुले-आंबेडकरांच्या विचारांची, खुद्द जोतिरावांनी ज्यांच्या उद्धारासाठी सपत्निक शेणधोंड्याचा मार खाल्ला. त्या बहुजनांनी तरी त्यांची काय पत्रास ठेवलीय? आज महाराष्ट्रात जे घडतंय ते पाहिलं तरी याची जाणीव होईल. फुले-आंबेडकरांच्या विचारांनी अनेकजण घडले. ते स्वतः समाजसुधारकच नव्हते तर त्यांच्या कृतिशील विचारांनी असंख्य सुधारक घडवले. फुले यांच्या विचारांनी सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. आंबेडकर, संत गाडगे महाराज यांच्यासारख्या अनेकांची सामाजिक परिवर्तनाच्या ऐतिहासीक कार्याची प्रेरणा ही महात्मा फुलेंचे विचार हीच होती. या साऱ्यांनी फुले यांच्या विचाराचं ऋण जाहीरपणे मानलं होतं. शुद्रातिशूद्र माणसाच्या उन्नतीचा, त्यांच्या सन्मानाचा विचार फुले-आंबेडकरांनी सांगितला त्यासाठी समाजाला धर्मकर्मकांडात घोळवून फसवणाऱ्या पोटभरुवृत्तीचा त्यांनी तडाखेबंद समाचार घेतला. सामाजिक समानतेबरोबरच स्त्रीशिक्षणाचा पुरस्कारही केला. जोतिरावांनी तर हा विचार कृतीत आणण्यासाठी या व्यापात आपल्या कुटुंबियांनाही गुंतविलं. सावित्रीबाईंनी जोतिबांच्या विचाराला कृतीत आणण्याचं काम अगदी मनापासून केलं. जीवघेणे हल्ले सोसले. पण हटल्या नाहीत. फुले यांच्या निधनानंतर इतकी वर्षे लोटली, पण तरीही सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात त्यांचाच विचार हा आपलं सर्वश्रेष्ठत्व टिकवून आहे. फुले-आंबेडकर यांच्या समर्थ विचारांचा हा गौरव असला तरी, सामाजिकदृष्ट्या ते एक लांच्छन आहे. कारण फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा आधार वाटू नये, अशी सामाजिक स्थिती अजून निर्माण झालेली नाहीये. किंबहुना यांच्याच विचारांची आवश्यकता तीव्रपण जाणवतेय. उच्चवर्णीय संघटित झालेत. दलित वस्त्या बळकट झाल्यात. स्त्रिया सुशिक्षित होऊ लागल्यात, कमावत्या झाल्यात तरी, बहुतांश संसारात त्यांचं स्थान दुय्यमच राहिलंय. स्त्री अजूनही उपभोगाची वस्तू आहे, अशीच भावना समाजात आहे. देवळं वाढलीत, त्या पुढच्या रांगाही वाढल्यात, लांबल्यात. अफरातफर व्हावी इतका गल्ला देवळात जमू लागलाय. हे सारं चित्र पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रात दिसतेय. तरीदेखील फुले-आंबेडकर यांचं नांव घेऊन राजकारण करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्यांनीही आपली वागणूक बदललीय. फुले-आंबेडकर नावाचा डिमडिम वाजवत आपला स्वार्थ साधण्यातच ते धन्यता मानू लागलेत. सदासर्वदा त्यांचंच नांव घेऊन, त्यांच्याच विचाराला हरताळ फासणाऱ्या त्यांच्या अनुयायांनी फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा पराभव केलाय. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
मनुवादी सेन्सॉरने ‘फुले’ चित्रपट अडवला!
महात्मा फुले यांच्या जीवनावरील ‘फुले’ हा चित्रपट आहे. त्याचा ट्रीझर प्रदर्शित होताच ब्राह्मण महासंघाच्या महिलांनी त्याला आक्षेप घेतलाय. हा चित्रपट जातीने ब्राह्मण असलेल्या अनंत महादेवन यांनी दिग्दर्शित केलाय. सेन्सॉरने ट्रीझरलाच तब्बल १२ बदल सुचवलेत. ते बदल केल्यानंतर ट्रीझर प्रदर्शित केलाय. तरीही ब्राह्मण महिलांनी निदर्शने केलीत आणि चित्रपट आम्हाला दाखविल्याशिवाय प्रदर्शित करू नये असा सज्जड दम कलेक्टरांना दिलेल्या निवेदनात दिलाय. वास्तविक या महिलांना शिक्षणाची दारं खुली करून फुले यांनीच आज त्यांना सक्षम बनवलंय. कुमारी मातांसाठी आपल्या घरी प्रसूतिगृह चालवलं, त्यांचा आणि त्या मुलांचा सांभाळ केला. विधवाचं केशवपन करून त्यांना वाळीत टाकलं जाई म्हणून पुण्यात नाभिक समाजाचा संप घडवून आणला. आज त्याच प्रताडीत झालेल्या समाजातल्या महिलांनी ‘फुले’ चित्रपटाला विरोध केलाय. सेन्सॉरने जात, मनू, मांग, महार वगैरे शब्द, सावित्रीबाईंच्या अंगावर मुलांनी शेण फेकण्याचा प्रसंग, त्यातला पेशवाईचा उल्लेख काढून तिथं राजांचा उल्लेख करा, तुमचे हात आणि पाय वेगळे केले असते…. हा संवाद चित्रपटातून काढा, असं या स्वतःला विद्वान समजणाऱ्या सदस्यांनी दिग्दर्शकाला सांगितलं. या सेन्सॉर बोर्डने याआधीही नामदेव ढसाळ यांच्यावरील ‘हल्ला बोल’ हा चित्रपट अडवून ठेवलाय. बोर्डच्या सदस्यांनी ‘नामदेव ढसाळ कोण?’ असा प्रश्नही विचारला होता. काश्मीर फाईल्स, केरला स्टोरी अशा चित्रपटाला डोळे झाकून परवानगी आणि समाज सुधारकांचे कार्य लोकांच्या पुढे येऊ नये, यासाठी अडथळे असं सेन्सॉरचं राज्यकर्त्यांचे प्रयत्न आहेत असं वाटावं अशी स्थिती आहे. आता आंबेडकरांनंतर फुलेही सत्ताधाऱ्यांना नकोसे झालेत. खरंतर संविधानानं घालून दिलेल्या साऱ्या मर्यादा उध्वस्त करणाऱ्या सेन्सॉर बोर्डच्या या सदस्यांची हकालपट्टीच करायला हवी.
चौकट
*१० हजार किलोची ‘एकता मिसळ’*
आकाश फाटलेलं असलं तरी, आपण जिथं राहतोय तेवढ्या भागाला ठिगळं लावलं तर आकाश सांधता येईल! या विचारानं ११ एप्रिलला महात्मा फुले जयंती आणि १४ एप्रिलला महामानव डॉ. आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं पुण्यात जातीअंतासाठी वेगळा उपक्रम राबविला जातोय. दलितांना आपल्या घरातली पाण्याची विहीर फुले यांनी खुली करून जातीअंताचा लढा आरंभला. डॉ.आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्यातलं पाणी देऊन सत्याग्रह केला. त्या दोन्ही घटनांची स्मृती जागवत सर्व जात, धर्म, पंथ, विचारांच्या लोकांनी एकत्र येत जातीयता नष्ट व्हावी, यासाठी पुण्यात १० हजार किलो ‘एकता मिसळ’ तयार करतात. मिसळीत जसं मटकीची उसळ, विविध मसाले, तेल, खोबरं, कांदा, लिंबू, कोथिंबीर असे सर्व पदार्थ एकजीव होतात, तशीच ही ‘एकता मिसळ’ कुण्या एकट्याची नव्हती तर ती इथल्या सर्व जातीधर्माच्या, विचारांच्या, विविध पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन केलेली असते. जणू जातीअंताच्या लढ्याला पुन्हा एकदा गती दिली जातेय. राज्यात जात, धर्म, पक्ष, राजकारण यातून कटुता येईल असं वातावरण असताना, ती दूर व्हावी यासाठी लोकसेवा प्रतिष्ठानचे दीपक पायगुडे हे पुढाकार घेतात. पण ते स्वतःचं नाव कुठं येऊ देत नाहीत. ही १० हजार किलोची ‘एकता मिसळ’ आणि १ लाख लोकांसाठीचं ताक यंदा ‘जोगेश्वरी मिसळ’ यांनी बनवलंय. ही समाजानं समाजासाठी केलेली समाजसेवा आहे, जातीअंतासाठीची केलेली धडपड आहे. म्हणूनच या उपक्रमाची माहिती मिळताच अनेकजण मदतीचा हात पुढं करतात. अगदी लहान मुलंही आपल्या बचतीचा मातीचा गल्ला फोडून मदत करतात, इथं लाखोंची वर्दळ असते, पण गोंधळ नाही की, गैरव्यवस्था! सारं काही सुरळीत, त्याग भावनेनं प्रत्येकजण सहभागी होत असतो. अशा निर्मोही, सदभावी वातावरणात जातीअंताची लढाई पुन्हा आरंभली जातेय!
हरीश केंची,