*महाशिवरात्री यात्रेच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा*

*भाविकांच्या गरजा आणि मागण्यांचा विचार करून नियोजनाचे निर्देश*
गडचिरोली, दि. 6: महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पिण्याचे पाणी, निवास, विशेषत: स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षेसंबंधी सर्व आवश्यक उपाययोजना भाविकांच्या गरजा आणि मागण्यांचा विचार करून वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
मार्कंडेश्वर तीर्थक्षेत्र व चपराळा देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्त आयोजित होणाऱ्या यात्रेच्या पूर्वनियोजना आढावा जिल्हाधिकारी यांनी आज मार्कंडा येथील धर्मशाळेत घेतला. बैठकीला उपविभागीय अधिकारी रणजित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी प्रसेनजीत प्रधान, उपविभागीय पोलिस अधिकारी जगताप, तहसिलदार प्रशांत गोरूडे, गटविकास अधिकारी सागर पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे तसेच सरपंच आणि मार्कंडा व चपराळा येथील मंदिर व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यात्रेच्या दरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेसह सर्व मूलभूत सोयी सुविधा सज्ज ठेवण्यावर भर देण्यात आला. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश दिले. यात्रेच्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त, नियंत्रण कक्ष, तसेच धर्मशाळांची दुरुस्ती करण्यात यावी. तसेच वैद्यकीय सुविधांसाठी औषधांचा पुरेसा साठा, वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती, तसेच रुग्णवाहिका आणि अग्निशमन यंत्रणा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय, भाविकांसाठी अधिकच्या बसेसची व्यवस्था, अखंडित वीजपुरवठा, पथदिवे, मोबाइल शौचालयांची व्यवस्था आणि स्वच्छतेवर विशेष भर द्यावा असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
*स्तनदा माता व वयोवृद्धांसाठी विशेष सोय*
महाशिवरात्री यात्रेला हजारो भाविक येतात, त्यामुळे दर्शनासाठी लागणाऱ्या दीर्घ रांगांमध्ये स्तनदा माता व वयोवृद्धांसाठी विशेष रांगेची व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसेच उन्हापासून बचावासाठी शेड आणि जागोजागी पाणपोई उभारण्याचे नियोजन करण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
*दर्शनाची वेळ वाढविण्याची मागणी*
बैठकीत मार्कंडेश्वर मंदिरात यात्रेदरम्यान दर्शनाची सकाळी ६ ते रात्री १० ही वेळ वाढवून २४ तास सुरू ठेवावी अशी मागणी भाविकांकडून करण्यात आली. यावर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर यंत्रणांसोबत चर्चा करून वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
*सर्व विभागांना समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश*
सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून यात्रेच्या तयारीत कोणताही अडथळा येऊ नये याची काळजी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बैठकीला महसूल, पोलिस, वन, सार्वजनिक बांधकाम, नगरपंचायत, दूरसंचार, अन्न व औषध प्रशासन, ग्रामपंचायत, परिवहन आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.