*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी*

गडचिरोली दि .१४– भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे प्रणेते आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती आज उत्साहात साजरी करण्यात आली. समाज कल्याण विभाग, क्रीडा विभाग तसेच नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आज सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. समाज कल्याण विभागाच्या वतीने नागरिकांसाठी बसण्याची योग्य व्यवस्था करत मंडप उभारण्यात आला होता. पुतळ्याच्या परिसरात फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता झाली. या वेळी समाज कल्याण विभाग सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, नेहरू युवा केंद्राचे अमित पुंडे, प्राध्यापक दिलीप बारसागडे, लेखा अधिकारी कुलदीप मेश्राम यांच्यासह वसतिगृहातील विद्यार्थी आणि संबंधित विभागांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर बौद्ध वंदना म्हणण्यात आली आणि सामाजिक समतेचा व सहभावाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने सहभागी होत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज कल्याण विभाग, क्रीडा विभाग व नेहरू युवा केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.