ताज्या घडामोडी

गडचिरोलीत आजपासून पाच दिवस महासंस्कृती महोत्सव, विविध कलांचा जागर

गडचिरोली : गडचिरोलीकरांसाठी दि.आज पासून महासंस्कृती महोत्सवांतर्गत पाच दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार असून स्थानिक कलावंतांसोबत बाहेरच्या प्रसिद्ध कलावंतांच्याही कार्यक्रमांचा आनंद गडचिरोलीकरांना घेता येणार आहे.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्यावतीने या महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन 16 ते 20 फेब्रुवारी 2024 दरम्यान महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पटांगणात करण्यात आले आहे. यासाठी करण्यात येत असलेल्या तयारीचा आढावा अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत घेतला. यावेळी कुरखेडाचे उपविभागीय अधिकारी विवेक साळुंके, तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या महोत्सवाचे उद्घाटक म्हणून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, तर अध्यक्षस्थानी वने, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, तर प्रमुख उपस्थितीमध्ये अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, आमदार सुधाकर अडबाले, रामदास आंबटकर, डॉ.अभिजीत वंजारी, डॉ.देवराव होळी, कृष्णा गजबे यांची उपस्थिती राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले.

या महासंस्कृती महोत्सवात शुक्रवार, दिनांक 16 रोजी “नक्षत्रांचे देणे” हा सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या मराठी हिंदी गाण्यांचा कार्यक्रम सारेगम विनर प्लेबॅक सिंगर ऋषिकेश रानडे व फिल्मफेयर अवार्ड विजेत्या गायिका आनंदी जोशी सादर करणार आहेत. 17 फेब्रुवारी रोजी ‘जागर लोककलेचा’ याअंतर्गत दंडार, गोंधळ, रेला नृत्याचे सादरीकरण झाडीपट्टी ग्रुपचे हरीशचंद्र बोरकर तर मेघा घाडगे व सहकलाकार लावणी सादर करणार आहेत. दि.18 फेब्रुवारी रोजी ‘बिरसा मुंडा यांची जीवनगाथा’ या महानाट्याचे सादरीकरण होईल. दि.19 रोजी समीर चौगुले आणि सहकाऱ्यासंकडून ‘हास्य जत्रा’ कार्यक्रमाचे तर मंगळवार, दि.20 रोजी कुँवारा भिवसेन यांच्या जीवनावर आधारित झाडीपट्टी महानाटकाचे सादरीकरण होणार आहे.

नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button