लोकसभा उमेदवार पी.चंद्रशेखर यांंचेकडे 5,785 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता

आंध्र प्रदेशातील गुंटूर लोकसभा मतदारसंघातून तेलुगू देसम पक्षाकडून पी चंद्रशेखर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. चंद्रशेखर यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे 5,785 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले होते की, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुल नाथ हे 19 एप्रिल रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सर्वात श्रीमंत उमेदवार होते. नकुल नाथ यांच्याकडे सुमारे 717 कोटींची संपत्ती आहे.
प्रतिज्ञापत्रात आपली मालमत्ता जाहीर केल्यानंतर चंद्रशेखर देशभरात प्रसिद्धी झोतात आले आहेत. चंद्रशेखर यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात 5,785 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जाहीर केली आहे. ते सध्या देशभरातून निवडणुकीसाठी उभारलेल्या सर्व उमेदवारांपैकी सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.
चंद्रशेखर यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची वैयक्तिक मालमत्ता 2,448.72 कोटी रुपये आहे, तर त्यांची पत्नी श्रीरथना कोनेरू यांच्याकडे 2,343.78 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तसेच मुलांकडे सुमारे 1,000 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. चंद्रशेखर यांच्या कुटुंबावर कर्ज म्हणून जेपी मॉर्गन चेस बँक ऑफ अमेरिकेचे 1,138 कोटी रुपयांचे देणे आहे.
आंध्र प्रदेशातील बुरीपालम गाव ते जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी-सिनाई हॉस्पिटलमध्ये नोकरी पासून उवर्ल्डची स्थापना करण्यापर्यंतचा चंद्रशेखर यांचा प्रवास खूपच रंजक आहे.
डॉक्टर-उद्योजक आणि आता नेते झालेले चंद्रशेखर यांनी 1999 मध्ये एनटीआर युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस विजयवाडा येथून एमबीबीएस आणि 2005 मध्ये पेनसिल्व्हेनियाच्या डॅनविले येथील गेसिंजर मेडिकल सेंटरमधून एमडी पदवी प्राप्त केली.
देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षा मानल्या जाणाऱ्या EAMCET वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी (MBBS) बसलेल्या 60,000 विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी राज्यात 27 वा क्रमांक मिळविला होता.
समाजसेवेची आवड असलेले चंद्रशेखर २०१० पासून टीडीपीच्या एनआरआय शाखेच्या वतीने पक्षाच्या अनेक कल्याणकारी कार्यक्रमांमध्ये काम करत आहेत.