ताज्या घडामोडी

*विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून विकासाचे नियोजन करणार – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*

*सामाजिक न्याय दिन साजरा* *घर घर संविधान योजनेचा शुभारंभ*

गडचिरोली, (जिमाका) दि. २६ : विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी शासनाच्या सर्व योजना व विकास आराखडे तयार करताना विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज दिली. विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधी मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा, परदेशी शिक्षण, उच्च शिक्षणासाठी तयार करणाऱ्या उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण विभाग, गडचिरोली यांच्या वतीने सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी, डॉ. आशिष खोब्रागडे, दिलीप बारसागडे, समाजकल्याण अधिकारी चेतन हिवंज, लेखाधीकारी कुलदीप मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.

*वातानुकूलित अभ्यासिकेचे उद्घाटन*
विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी जिल्हा मुख्यालयात २०० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली अद्यावत वातानुकूलित ग्रंथालय वजा अभ्यासिका उभारण्यात आली असून, त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी पंडा यांच्या हस्ते करण्यात आले. तालुकास्तरावरही अशा सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
*‘आपला दोस्तालू’ मार्फत घरबसल्या शासकीय योजनांची माहिती*
यावेळी ‘आपला दोस्तालू’ या अभिनव उपक्रमांतर्गत ९४२३११६१६८ या व्हाट्सअ‍ॅप क्रमांकावरून ग्रामीण व अतिदुर्गम भागातील नागरिकांना घरबसल्या शासकीय योजनांची माहिती मिळवता येणार असल्याची व नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पंडा यांनी केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. शासनामार्फत सर्वांना समान संधी उपलब्ध करून दिल्या जात असून, पुणे-मुंबईसारख्या शहरांपेक्षा चांगले ग्रंथालय गडचिरोलीत उभारण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांना इस्रोच्या भेटीपासून ते दर्जेदार शिक्षणापर्यंत सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात घर घर संविधान अभियान, आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिन व नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी केले.
या कार्यक्रमाला सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button