*डिजिटल जनगणना 2027 साठी 40 क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण : तालुकास्तरावर अचूक व प्रभावी प्रशिक्षण देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*
गडचिरोली, (जिमाका) दि. 10 : जनगणना -2027 कार्यक्रमाच्या अनुषंगाने टप्पा-1 साठी नियुक्त क्षेत्रीय प्रशिक्षक यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण गडचिरोली येथे यशस्वीरित्या पार पडले. दिनांक 06 ते 08 एप्रिल 2026 या कालावधीत जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
जगनणना संचालनालय, मुंबई आणि जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रशिक्षणात एकूण 40 क्षेत्रीय प्रशिक्षकांनी सहभाग घेतला. यंदाची जनगणना पूर्णपणे कागदविरहित आणि डिजिटल पद्धतीने पार पाडली जाणार असल्यामुळे प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, प्रगणक व पर्यवेक्षकांना योग्य प्रशिक्षण देण्यासाठी क्षेत्रीय प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमास जनगणना संचालनालय, मुंबई येथील सहाय्यक संचालक श्री. जोगेंद्र तामगाडगे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील नायब तहसीलदार श्री. हेमंत मोहरे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी श्री. आशिष वानखेडे व तहसीलदार श्री. संतोष आष्टीकर यांनी प्रशिक्षणार्थींना सविस्तर मार्गदर्शन करत त्यांच्या शंकांचे निरसन केले.
*प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी क्षेत्रीय प्रशिक्षकांना संबोधित करत तालुकास्तरावरील प्रशिक्षण जबाबदारीने व अचूकपणे पार पाडण्याचे आवाहन केले. डिजिटल पद्धतीने होणाऱ्या जनगणनेत प्रत्येक घटकाची अचूक नोंद होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.*


