ताज्या घडामोडी

*गुरनोली व घाटी रेती वितरण प्रकरणात चौकशी समिती नियुक्त*

*स्थानिक रहिवासी व घरकुल लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात वाळूचा पुरवठा*

**गडचिरोली दि.११:
जिल्ह्यातील राखीव रेतीघाटांमधून घरकुल लाभार्थ्यांसाठी आरक्षित असलेली रेती खाजगी कंत्राटदारांना पुरवण्यात आल्याच्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष चौकशी समितीची नियुक्ती केली आहे.

*दोषींवर होणार कडक कारवाई*
गुरनोली आणि घाटी येथील रेतीघाटांमधून घरकुल लाभार्थ्यांची रेती नियमबाह्यरीत्या खाजगी कंत्राटदारांना दिल्याबाबत माध्यमातून वृत्त प्रकाशित झाले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती गठीत केली असून, या समितीच्या अहवालानुसार जे कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

*’महाखनिज’ प्रणालीत तांत्रिक बदल*
भविष्यात अशा प्रकारच्या अनियंत्रित रेती उपशाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने तांत्रिक पावलेही उचलली आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील राखीव रेतीघाटांमधून स्थानिक रहिवासी (वैयक्तिक वापर) आणि घरकुल लाभार्थी यांच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही शासकीय प्रकल्पांसाठी किंवा कामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व मान्यतेशिवाय वाळू उपलब्ध होऊ नये, यासाठी ‘महाखनिज’ प्रणालीमध्ये आवश्यक बदल करण्याचे निर्देश मे. शौर्या टेक्नोसॉफ्ट प्रा. लि. पुणे यांना देण्यात आले आहेत.

*आतापर्यंतचे रेती वितरण आणि सद्यस्थिती*
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांना रेतीचा पुरवठा करण्यात आला आहे:
*स्थानिक रहिवासी:*जिल्ह्यातील 1,771 स्थानिक रहिवाशांना त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी एकूण 14 हजार 246 ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यात आली आहे.

*घरकुल लाभार्थी:* एकूण 32 हजार 129 घरकुल लाभार्थ्यांना आतापर्यंत 1 लाख 61 हजार 320 ब्रास वाळूचा पुरवठा करण्यात आला आहे.

सध्याच्या नियमांनुसार, स्थानिक वापरासाठी 600 रुपये स्वामित्वधन व इतर रकमांचा भरणा करून वाळू दिली जात आहे. तसेच, घरकुल लाभार्थ्यांना कमाल 5 ब्रासपर्यंत वाळू विनामूल्य वितरित केली जात असून, ही प्रक्रिया जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांच्या स्तरावरून सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button