ताज्या घडामोडी

*आपत्तीपूर्व तयारीत समन्वय व तत्परता राखा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*

*जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखड्यास मंजुरी*

गडचिरोली, (जिमाका) दि. १४ :
जिल्ह्यातील विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी अद्ययावत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखड्यानुसार सर्व विभागांनी समन्वयाने आणि सज्जतेने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस प्राधिकरणाचे सदस्य व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

*आपत्ती व्यवस्थापन आराखड्याला मंजुरी*

बैठकीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्याची आपत्तीप्रवणता लक्षात घेऊन संभाव्य धोके, त्यांचे स्वरूप, चालू व भविष्यातील तसेच नव्याने उद्भवणाऱ्या जोखीम, संवेदनशील ठिकाणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचा समावेश असलेला हा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे यांनी दिली. चर्चेनंतर सदर आराखड्यास प्राधिकरणाकडून मंजुरी देण्यात आली.

*सर्व विभागांना तत्परतेचे निर्देश*

आपत्ती व्यवस्थापन ही केवळ एका विभागाची जबाबदारी नसून सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक आहे. त्यामुळे सर्व विभागांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीचा आढावा घ्यावा आणि आराखड्यानुसार कार्यवाही सुनिश्चित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

*मानव–वन्यजीव संघर्षावर तातडीच्या उपाययोजना*

आराखड्यात मानव–वन्यजीव संघर्षाचाही समावेश करण्यात आला असून, विशेषतः वडसा व गडचिरोली विभागात या संघर्षाची तीव्रता वाढत असल्याचे वन विभागाकडून निदर्शनास आणण्यात आले. या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

*पूरस्थिती नियंत्रण व पूर्वसूचना यंत्रणा*

भामरागड, अहेरी व सिरोंचा तालुक्यांतील मान्सूनकालीन पूरपरिस्थिती लक्षात घेऊन ग्रामपातळीवर अलर्ट यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच धरणांतून पाणी विसर्गाबाबत ऑटोमॅटिक पूर्वसूचना देणारी प्रणाली कार्यान्वित करण्याचे आदेश पाटबंधारे विभागास देण्यात आले.
भामरागड तालुक्यातील इंद्रावती, पर्लकोट व पामुलगौतम नद्यांमुळे उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीबाबत सखोल सर्वेक्षण करून उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.

बैठकीला उपवनसरंक्षक श्रीमती आर्या व्ह‍ि एस,, उपव‍िभागीय अध‍िकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अरुण एम, न‍िवासी उपज‍िल्हाध‍िकारी आश‍िष वानखेडे, पाटबंधारे व‍िभागाचे कार्यकारी अभ‍ियंता राहुल मोरघडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभ‍ियंता सुरेश साखरवाडे व अव‍िनाश मोरे तसेच इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button