*“मिशन–२०० उपक्रम जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा नवा मानदंड ठरेल” – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*

गडचिरोली, (जिमाका) दि.१३ : “गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना देश–विदेशातील नामांकित विद्यापीठांत शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना योग्य दिशा व सातत्यपूर्ण मार्गदर्शन देणारा नियोजित ‘मिशन–२००’ हा उपक्रम जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा नवा मानदंड ठरेल,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी काल समाज कल्याण विभागामार्फत आयोजित तीन दिवसीय निवासी फाउंडेशन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी केले.
समाज कल्याण विभाग, गडचिरोली यांच्या वतीने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना देशातील तसेच देशाबाहेरील नामांकित विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षांची पूर्वतयारी करून देण्यासाठी ‘मिशन–२००’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २०० विद्यार्थ्यांना भारतातील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU), दिल्ली विद्यापीठ (DU), टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (TISS), अजीम प्रेमजी विद्यापीठ, शिव नाडर विद्यापीठ, पिरमल विद्यापीठ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ( IIT), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) तसेच परदेशातील नामांकित विद्यापीठांच्या परीक्षांची नियोजित तयारी करून दिली जाणार आहे.
या उपक्रमासाठी संकल्प फाऊंडेशन यांच्या माध्यमातून वर्षभर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार असून, ज्या अभ्यासक्रमांचे शुल्क साधारणतः ४ ते ५ लाख रुपये आहे, ते अभ्यासक्रम समाज कल्याण विभागामार्फत जिल्ह्यातच पूर्णतः मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार अभ्यासक्रमांची निवड, अर्ज भरणे, प्रवेश परीक्षा तयारी ते अंतिम प्रवेश मिळेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया विभागाकडून मार्गदर्शित केली जाणार आहे.
कार्यशाळेदरम्यान देश–विदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे निवड झालेल्या विशाल मेश्राम, युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहॅम येथे निवड झालेल्या अभय पेंदाम तसेच इटरनल युनिव्हर्सिटी हिमाचल प्रदेश येथे निवड झालेल्या कुमारी चैतन्या गोमसकार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त, डॉ. सचिन मडावी, संकल्प फाऊंडेशनचे संचालक पंकज नरुले उपस्थित होते.



