ताज्या घडामोडी

*गडचिरोलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात साजरा — संघ समजण्यासाठी शाखेत यावे लागेल – सुहासजी भगत*

गडचिरोली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने गडचिरोली शहरात विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाला प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र सह सेवा प्रमुख सुहासजी भगत, प्रमुख अतिथी म्हणून ऍड. संदीप धाईत, जिल्हा संघ चालक घिसूलाल काबरा, तालुका संघ चालक उकन्ट राऊत व नगर संघ चालक नीलकंठ भांडेकर यांची उपस्थिती होती.

प्रमुख वक्ते सुहासजी भगत यांनी आपल्या प्रभावी भाषणात संघाच्या कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे एक संघटन समर्थ करणारे कार्य आहे. देशभरात सुमारे 85 हजार शाखा कार्यरत आहेत. हिंदूंचे संघटन डॉक्टर हेडगेवारांनी केले. संघात सर्व धर्मांचे लोक कार्यरत असून संघ कोणताही भेदभाव करीत नाही. आज संघामार्फत 34 संघटना कार्यरत आहेत आणि या कार्याचा आधार ही शाखा आहे. संघाला समजून घ्यायचे असेल तर शाखेत यावे लागेल, दूर राहून संघ समजणे शक्य नाही.”

ते पुढे म्हणाले की, “संघ आज समाजातील प्रत्येक क्षेत्रात काम करीत आहे आणि सातत्याने वाढत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे हिंदू समाज हा संघाचा दृढ आधार आहे. सामाजिक समरसता, स्वावलंबन, कुटुंब प्रबोधन, सामाजिक सदभाव आणि भारताला विश्वगुरू बनविण्याचे पंच परिवर्तन हे संघाचे कार्य आहे. त्यासाठी हिंदू समाज संघटित राहणे अत्यावश्यक आहे.”

प्रमुख अतिथी ऍड. संदीप धाईत यांनी आपल्या भाषणात संघाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, संघाच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर संघ चालक नीलकंठ भांडेकर यांनी केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 27 सप्टेंबर 1925 रोजी नागपूर येथे डॉक्टर केशव हेडगेवार यांनी केली. हिंदू राष्ट्रनिर्मितीची प्रतिज्ञा करून त्यांनी अविरत कार्याची सुरुवात केली. प्रारंभीच्या काळात अनेक अडचणी आणि त्रासांना सामोरे जावे लागले. मात्र आज शंभर वर्षांनंतर संघाचे कार्य देशातील प्रत्येक जिल्ह्यात आणि गावागावात पोहोचले आहे.

गडचिरोली शहरात साजरा झालेला विजयादशमी उत्सव हा संघाच्या कार्याचा दृढ संकल्प आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button