*’समृद्ध गडचिरोली’च्या निर्मितीचा संकल्प – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल*

*भारताचा 79 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा*
गडचिरोली, 15 ऑगस्ट (जिमाका): गडचिरोली जिल्ह्यात विविध विकासात्मक कामातून समृद्ध गडचिरोली, रोजगार निर्माण करणारा गडचिरोली आणि सर्वदृष्टीने परिपूर्ण गडचिरोली निर्माण करण्याचा संकल्प राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी आज व्यक्त केला.
भारताचा 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळ उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल, खासदार डॉ. नामदेवराव किरसान, आ. डॉ. मिलींद नरोटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सहायक जिल्हाधिकारी रणजित यादव, अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
एकेकाळी नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्याची प्रतिमा आता विकासाभिमुख आणि प्रगतीशील म्हणून बदलत आहे. भविष्यात गडचिरोली जिल्हा दरडोई उत्पन्नात महाराष्ट्रातील पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये समाविष्ट होईल, असा आशावाद मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला आहे, या दिशेने शासन वेगाने काम करत असल्याची ग्वाही श्री जयस्वाल यांनी यावेळी दिली.
गडचिरोलीतील विकासकामांसाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जात आहे. जिल्ह्यात सध्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये राष्ट्रीय महामार्गांचे रखडलेले काम मार्गी लावण्यापासून ते सिंचनाच्या सोयीसुविधा वाढवण्यासाठी नद्यांवर बंधारे बांधण्यापर्यंत विविध कामांचा समावेश आहे.
*स्थानिकांना रोजगाराची संधी*
जिल्ह्यातील रोजगाराची समस्या सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. केवळ जिल्ह्यातच नव्हे, तर गडचिरोली इतर जिल्ह्यांनाही रोजगार पुरवू शकेल, अशा प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी स्थानिक तरुणांना सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (MPSC, UPSC) आणि वातानुकूलित वाचनालये सुरू करण्यात आले असून महिला बचत गटांच्या सक्षमीकरणावरही भर दिला जात आहे.
*कृषी आणि पर्यटन क्षेत्राला चालना*
जिल्ह्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कृषी आणि पर्यटन क्षेत्राला विशेष चालना दिली जात आहे. 100 टक्के धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस दिला जात आहे. तसेच, जिल्ह्याच्या रानभाज्यांचे ब्रँडिंग करून त्यांना राजाश्रय देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी नवीन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत, जे लवकरच पूर्ण होतील.
*आव्हानांवर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर*
गडचिरोलीच्या विकासातील प्रमुख आव्हाने जसे की वनांशी संबंधित समस्या, सिंचनाचे प्रश्न, आणि जंगली हत्तींमुळे होणारे नुकसान यावर मात करण्यासाठी एआय (Artificial Intelligence) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी आणि सर्व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना समर्पकपणे काम करून गडचिरोलीला पुढे नेण्याचे आवाहन करण्यात आले.
*ग्रामीण विकासासाठी नवे अभियान*
शासनाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” सुरू केले असून, सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदेने यात सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सहपालकमंत्री पदाची जबाबदारी देवून मुख्यमंत्री महोदयांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ ठरवण्यासाठी मी प्रयत्न करत राहीन, अशी ग्वाही देत रस्ते, वीज, हत्तींमुळे होणारे नुकसान यांसारख्या सर्व अडचणींकडे आपले लक्ष असून त्या क्रमाक्रमाने मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे श्री जयस्वाल यांनी सांगण्यात.
*जिल्हा प्रशासन व पोलिस दलाच्या कार्याचे कौतुक*
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलातील सात अधिकारी/कर्मचाऱ्यांचा राष्ट्रपती सेवा पदकाने गौरव झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच जिल्हा प्रशासनातर्फेही चांगले काम सुरू असल्याचे त्यांनी कौतुकाने सांगितले.
यावेळी विविध कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहपालकमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व नागरिक उपस्थित होते.
0000