ताज्या घडामोडी

*जमिनीचे आरोग्य राखण्यासाठी डिएपी ला पर्यायी जैविक खतांचा वापर वाढवा – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रीती हीरळकर यांचे शेतकऱ्यांना आवाहन*

गडचिरोली, दि.8 : शाश्वत शेतीच्या दिशेने वाटचाल करताना जैविक खतांचा वापर ही काळाची गरज ठरत आहे. खर्चात बचत, आरोग्यपूर्ण शेती आणि पर्यावरण रक्षण या त्रिसूत्रीचा स्वीकार करून शेतकऱ्यांनी जैविक खतांचा अधिकाधिक उपयोग करावा, असे कृषी तज्ञांचे मत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जमिनीचे आरोग्य राखण्यासाठी डाय-अमोनियम फॉस्फेट (DAP) या रासायनीक खताला पर्याय म्हणून जैविक खतांचा वापर वाढविण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले आहे.

*DAP म्हणजे काय?*

DAP हे रासायनिक खत असून त्यात नत्र (नायट्रोजन) व स्फुरद (फॉस्फरस) ही दोन प्रमुख अन्नद्रव्ये असतात. हे खत पिकांना झपाट्याने अन्नद्रव्ये पुरवते, पण याचा दीर्घकाळ उपयोग केल्याने जमिनीची सुपीकता कमी होण्याची शक्यता असते. यामुळे पर्यायी जैविक खतांचा वापर करून पिकांना आवश्यक पोषण देणे ही शाश्वत शेतीसाठी गरजेची बाब बनली आहे.

*DAP ला पर्यायी प्रमुख जैविक खते*

फॉस्फेट विरघळवणारे जिवाणू (PSB): जमिनीतील अविद्राव्य स्फुरद पिकांना उपलब्ध करून देतात. त्यामुळे स्फुरद खतांचा वापर कमी होतो. उदा. Bacillus megaterium, Pseudomonas.
रायझोबियम: शेंगावर्गीय पिकांच्या मुळांवर गाठी तयार करून वातावरणातील नत्र स्थिर करतात. विशेषतः हरभरा, सोयाबीनसाठी उपयुक्त.
अझोटोबॅक्टर: शेंगा नसलेल्या पिकांसाठी नत्र स्थिरीकरण. उदा. गहू, मका, कापूस.
अझोस्पिरिलम: तृणधान्य पिकांसाठी उपयुक्त. नत्राची उपलब्धता वाढवून पिकांची वाढ सुधारते.
पालाश उपलब्ध करणारे जिवाणू (KMB): जमिनीत असलेल्या परंतु अकार्यक्षम स्वरूपातील पालाश पिकांना उपलब्ध करून देतात.
व्हॅम / मायकोरायझा: ही बुरशी पिकांच्या मुळांशी सहजीवन करत स्फुरद, झिंक व पाणी शोषण्यास मदत करते. दुष्काळी परिस्थितीत फायदेशीर.

कंपोस्ट व शेणखत: पारंपरिक सेंद्रिय खते असून जमिनीचा पोत सुधारतात व पाण्याची धारणशक्ती वाढवतात.
प्रोम (PROM): गायीच्या शेणावर प्रक्रिया करून तयार केलेले फॉस्फेट समृद्ध खत. स्फुरद सेंद्रिय स्वरूपात देणारे आणि DAP ला प्रभावी पर्याय.

*जैविक खतांचे फायदे*

जमिनीतील सूक्ष्मजीवांना चालना देऊन सुपीकता वाढवतात. रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होते. प्रदूषणाचे प्रमाण घटते. पिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. पाण्याचा वापर कमी होतो. दीर्घकालीन परिणाम मिळतात.

*साठवण व वापराबाबत सूचना*
जैविक खते नेहमी थंड, कोरड्या आणि अंधाऱ्या ठिकाणी साठवावीत. रासायनिक कीटकनाशकांपासून दूर ठेवावीत. जैविक खतांचा अधिक फायदा मिळवण्यासाठी माती परीक्षण करून त्यानुसार खतांचा वापर करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button