ताज्या घडामोडी

ऐसे कैसे झाले भोंदू…!

- हरीश केंची

‘प्लेबॉय’ म्हणून शोभेल अशा लीला करणारा भोंदू, रुपाली चाकणकर यांचा ‘पांडुरंग’, कथित ज्योतिषी अशोक खरातला लैंगिक शोषणाच्या आरोपावरून अटक झालीय. समाज, अंधश्रद्धा, राजकारण यांच्यातल्या संगनमताचं हे उदाहरण! केवळ भोंदू खरातच नव्हे तर आज सर्वत्र अशा बुवा, बाबांनी उच्छाद मांडलाय. ‘राम’ नांव धारण करणारे काही ‘हराम’खोर गजाआड झालेत. राजकारणी, दोन नंबरच्या धंद्यातले लोक याला कारणीभूत आहेत. राजकारण्यांसाठीची प्रसिद्धी अन् बुवा, बाबांची नसलेली सिद्धी या त्यांच्या सिद्धी-प्रसिद्धीच्या मोहमायेत सामान्य जनता, अनुयायी हे बुद्धिबळातले प्यादे ठरताहेत. ‘धर्मसत्तेनं राजसत्तेला मार्गदर्शन करावं…!’ असं म्हणणारे आज सत्ताधारी आहेत. ही त्यांची मानसिकता बदलणार कशी? सत्ताधारीच असं वागत असतील तर मग अशा भोंदू बुवा बाबांना आवरणार तरी कोण?
—————————————–
ऐसे कैसे झाले भोंदू l कर्म करोनि म्हणती साधू ll
अंगा लावूनियां राख l डोळे झांकुनी करिती पाप ll
दावुनि वैराग्याची कळा l भोगी विषयांचा सोहळा ll तुका म्हणे सांगों किती l जळो तयांसी संगती ll
जगद् गुरू संत तुकाराम महाराजांचा हा अभंग पदोपदी आठवतोय..! कुरूप विचारांचा भोंदूपणा, सगळ्या नैतिकतेचंच चाक रुतवून टाकतो. हे आज महाराष्ट्र अनुभवतोय. ‘महिला आयोगातल्या जिजाऊच्या फोटोला आज ताडकन तडा गेलाय. जेव्हा तिथल्या खुर्चीला रांझ्याचा पाटील पितृतुल्य झाला, तेव्हा त्या खुर्चीतून बेगडी नीतिमत्ता ओसंडून वाहिली. सामाजिक, कौटुंबिक, की, वैयक्तिक सीमारेषाच पुसट झाली! काठी आधाराची होती पण स्वार्थापायी मोडून पडली. न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या अहिल्येची पुन्हा एकदा शिळा झाली. ‘सावित्रीची लेक’ जिथं भोंदूच्या पावलांवर झुकली. तिथं गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, साऱ्या अक्षरधनाची अक्षरशः होळी झाली…!’ अशी महिला आयोगाच्या कारभाराची लक्तरं टांगणारी कविता सोशल मीडियावर फिरतेय. यावर चहूबाजूने टीकेची झोड उठल्यानंतर या भोंदू बाबाच्या ट्रस्टवर असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला सांगितलं. अन् अखेर त्यांनी शुक्रवारी रात्री राजीनामा दिला. स्वतःला अंकशास्त्रज्ञ म्हणवून घेणाऱ्या स्त्रीलंपट, भोंदू अशोक खरात याच्या अटकेनंतर, त्याच्या विकृत कृत्यांचे पुरावे समोर येण्यामागे एका मोठ्या कटाचा उलगडा झालाय. ज्या आक्षेपार्ह व्हिडिओंनी खळबळ उडवून दिली, ते व्हिडिओ प्रत्यक्षात खरातच्याच ऑफिस बॉयने खंडणीसाठी चोरले होते, अशी माहिती समोर आलीय. खरातच्या कार्यालयात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे ५८ सीसीटीव्ही फुटेज संशयित ऑफिस बॉय नीरज जाधव याने डिसेंबर २०२५ मध्ये चोरले होते. खरात महिलांवर अत्याचार करत असतानाचे हे पुरावे आहेत. नीरजने या क्लिप्सच्या बदल्यात खरातकडे ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. मात्र, समाजात ‘साधू’ म्हणून वावरणाऱ्या भोंदू खरातने या धमक्यांना जुमानले नाही. पैसे मिळत नसल्याचे पाहून नीरजने या व्हिडिओंचे स्क्रीनशॉट पीडित महिलांना पाठवून त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. नीरजने एका २८ वर्षीय विवाहितेचा आक्षेपार्ह व्हिडिओ तिच्या मेहुण्याला पाठवला, तेव्हा हे सारं प्रकरण बाहेर आलं. मेहुण्याने पीडितेला धीर दिला आणि पोलिसांत तक्रार करण्यास प्रोत्साहित केले. या धाडसामुळेच खरातच्या ‘लिंगपिसाट’ वृत्तीचा, मंत्र-तंत्राच्या नावाखाली सुरू असलेल्या अत्याचाराचा बोभाटा झाला. दुसरीकडे, शिर्डीतल्या एका २४ वर्षीय महिलेलाही नीरजने मॉर्फ केलेले फोटो पाठवून धमकावले होते. तिने पोलीस तक्रार केली होती, मात्र शिर्डी पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नाही, असा आरोप केला जातोय. याचे गांभीर्य लक्षात घेऊन याचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आलाय.
ही घटना समाज, अंधश्रद्धा-राजकारण यांच्यातल्या संगनमताचे उदाहरण आहे. अशा घटना नवीन काही नाहीत; परंतु प्रत्येकवेळी त्यातून उघड होणारी बाब म्हणजे स्वत:ला बाबा, बुवा, गुरू, ज्योतिषी म्हणवून घेणार्‍या व्यक्तींना मिळणारा राजकीय आश्रय, त्यातून निर्माण होणारे अभेद्य सत्ताकवच…! लैंगिक शोषणासारखा गुन्हा ही विकृती आहेच; शिवाय तो सत्तेचा अन् प्रभावाचा गैरवापर आहे. अशा बुवा, बाबांकडे लोक श्रद्धेने जातात, त्यांच्यावर समस्या सोडवण्यासाठी विश्वास ठेवतात. हाच विश्वास मग अशा व्यक्तींकडून शस्त्रासारखा वापरला जातो. जेव्हा एखादी व्यक्ती स्वत:ला आध्यात्मिक किंवा अलौकिक शक्ती असलेली म्हणून सादर करते, तेव्हा तिच्याभोवतेी भीती अन् आकर्षण तयार होतं. यामुळे पीडित व्यक्तींना आवाज उठवणं कठीण होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, मंत्री दीपक केसरकर, मंत्री विखे पाटील, आमदार जयंत पाटील, खासदार नीलेश लंके अशा सर्व पक्षाच्या नेत्यांची नावे समोर येताहेत. राजकीय नेते अशा व्यक्तींकडून आशीर्वाद घेताना दिसतात, तेव्हा समाजात चुकीचा संदेश जातो. जर इतके मोठे नेते या बाबावर विश्वास ठेवतात, तर ते नक्कीच योग्य असतील असं सामान्य नागरिकांना वाटतं. मग अशा बाबांची सामाजिक मान्यता वाढते. भोंदू खरातवर लैंगिक शोषणाचा आरोप असताना, त्याच्या संस्थेशी संबंधित रूपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, ही बाब धक्कादायक, संतापजनक आहे. ज्या व्यक्तीवर महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, तिचेच नाव अशा व्यक्तीच्या संस्थेशी जोडले जाते, तेव्हा संपूर्ण व्यवस्थेची विश्वासार्हता कोलमडते. सत्ताधार्‍यांची भूमिका इथं संशयास्पद ठरते. एखादा विरोधी पक्षाचा कार्यकर्ता अशा प्रकरणात अडकला असता, तर पोलिसांची कारवाई, माध्यमांचा दबाव, राजकीय निषेध यांचा भडिमार झाला असता. पण जेव्हा सत्तेशी जवळीक असते, तेव्हा अचानक मौन पाळलं जातं, चौकशी संथ होते अन् जबाबदारी टाळण्याचा खेळ सुरू होतो. ही सध्याची दुहेरी मापदंडांची पद्धत लोकशाहीसाठी घातक आहे. अंधश्रद्धा हा या समस्येचा केंद्रबिंदू आहे. लोक ज्योतिष, तांत्रिक उपाय, चमत्कार यांवर आजही विश्वास ठेवतात. शिक्षण आणि विज्ञानाचा प्रसार झाला असला तरी मानसिक पातळीवर अंधश्रद्धा अजूनही घट्ट रुजलेली आहे. आर्थिक, कौटुंबिक, आरोग्याशी संबंधित समस्या असते, तेव्हा ती व्यक्ती कोणत्याही आशेच्या किरणाकडे धाव घेते. याच मानसिकतेचा फायदा अशा बाबांकडून घेतला जातो. जेव्हा एखाद्या भोंदू बाबावर आरोप असतानाही त्याला जेव्हा राजकीय पाठबळ मिळते, तेव्हा पीडिताला न्याय मिळण्याची शक्यता कमी होते. प्रभावशाली लोकांवर कारवाई होत नाही असा संदेश समाजात जातो. यामुळे न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कमी होतो. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदे आहेत. पोलीस प्रशासनाने दबावाला बळी न पडता अशा प्रकरणांवर तातडीने कठोर कारवाई करून पीडितांना संरक्षण अन् न्याय मिळवून देण्यासाठी यंत्रणा उभारली पाहिजे. भोंदूना गजाआड केलं पाहिजे.
विज्ञानानं जग जवळ आलंय. हृदयाला भिडलंय. आयुष्याला गती, आनंद देणाऱ्या गोष्टी माणसाच्या जवळ आल्यात. पण अनेक सामाजिक, सांसारिक, शारीरिक व्याधी-व्यथांनी माणसाला घेरलंय. माणसं जवळ असली तरी मनानं दूर जाताहेत. अशावेळी देव, धर्म, अध्यात्म याचा त्याला आधार वाटतो. ही त्याची गरज ओळखून काहींनी बाजार मांडलाय. बाजार म्हटलं की जे काही असतं ते सारं इथे दिसतं. खरं तर सत्संग हा उपचार नाही, ती सहजप्रवृत्ती आहे. ‘शेवटचा दिस गोड व्हावा’ किंवा मोक्षासाठी देव, धर्म, कार्य नाही. जे आपण अनुभवतो, जगतो त्यातल्या विकारांचा नायनाट करण्यासाठी सत्संग, अध्यात्म आहे. असा सत्संगच मूर्तीतल्या देवाला, धर्माला, अहंकाराला भडभुंजा ठरवणाऱ्या देवमाणसाचं दर्शन घडवितो! या बुवाबाजीनं केवळ अशिक्षितांनाच नव्हे तर सुशिक्षितांना सुद्धा आपल्या कह्यात घेतलंय. अल्पशिक्षित, अर्धशिक्षितांमध्ये संभ्रमाची भावना निर्माण होतेय. हल्ली आपल्याकडं अध्यात्म, धर्म, श्रद्धा, यासारख्या शब्दांना चांगले दिवस आलेत. जिकडे तिकडे सत्संग, प्रवचन, योग शिबीर, आयोजित केली जाताहेत. प्रसिद्धीमाध्यमे दररोज अशा या बुवा बाबांच्या प्रवचनाचे रतीब घालताहेत. त्यामुळे अशा सत्संगाला हजारो भाविकांची हजेरी लागते. देवाधर्माच्या नावाने पोट जाळणाऱ्यांनी देवाला आकारात आणि धर्माला कर्मकांडात अडकवलंय. भौतिक प्रगतीतून लोकांमध्ये भोगवादी वृत्ती वाढतेय. चंगळ वाढतेय. एकीकडे मौजमजा करायची, वाट्टेल त्या मार्गाने पैसा, संपत्ती मिळवायची, दुसरीकडे पुण्य गाठीशी बांधण्याचा ‘शॉर्टकट’ म्हणून बुवा-बाबांचा हा सत्संग करायचा; ही वृत्तीही हे प्रस्थ वाढविण्यास कारणीभूत आहे. उच्चभ्रू वर्गातले सुशिक्षित डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील, शास्त्रज्ञ, व्यापारी, चित्रतारका, खेळाडू, राजकारणी, या मंडळींनी बुवा बाबांचा सत्संग हा स्टेटस सिम्बॉल झालाय. सामान्य माणसं त्याचं अनुकरण करतात. बऱ्याच जणांना परमपूज्य मंडळींचं भजन-पूजन, वाणी-श्रवण केलं की, आपण धार्मिक, आध्यात्मिक झालो असं वाटतं. स्वामी विवेकानंदांनी या वृत्तीवर परखड टीका केलीय. ते म्हणतात, “खऱ्या धर्मात कोणत्याही विश्वासाला अन् श्रद्धेला स्थान नाही. कोणत्याही महान धर्माचार्याने अंधविश्वासाची शिकवण दिलेली नाही. अंधविश्वास हा धर्मग्लानीकाळातच पुढे येतो. मूर्ख लोक कोणातरी महान विभूतीचे अनुयायी असल्याचा आव आणतात आणि त्यांच्या स्वतःमध्ये कोणतेही सामर्थ्य नसले, तरी इतरांना डोळे मिटून विश्वास ठेवण्याचा उपदेश देतात. पण विश्वास ठेवायचा कशावर? आंधळेपणाने श्रद्धा ठेवल्याने माणसाचा अधःपात होतो. तुम्ही नास्तिक झाला तरी चालेल, पण कशावरही डोळे मिटून विश्वास ठेवू नका. उगीच स्वतःला पशूंच्या पातळीवर का घसरू देता? त्यामुळे तुम्ही स्वतःचंच नुकसान घेत नसून, समाजाचेही नुकसान करता! अंधविश्वासाच्या भरीला न पडता दृढतेनं तर्कबुद्धीच्या सहाय्यानं विचार करा. या अवस्थेप्रत जेव्हा तुम्ही पोहोचाल तेव्हाच तुम्ही धार्मिक व्हाल. तोपर्यंत तुम्ही पशुपेक्षा भिन्न नसाल…!” तर महात्मा गांधींनी म्हटलंय “श्रद्धा ही नीतीला पर्याय नाही….!” मानवी व्यवहाराच्या नावानं दिवसभर अशुभं करायचं अन् सांजवातीला शुभंकरोती म्हणायचं, ही विसंगती देवाधर्माला बदनाम करणारी आहे. अंतरीचा ज्ञानदीप सतत तेवत असेल तर रोजचं जगणंही उजळून निघेल, यासाठी कुणाची करुणा भाकायची गरज नाही. नियत साफ असली म्हणजे बस्स!.
कालपर्यंत खेडूत, ग्रामीण, अशिक्षित, गरीब वर्गाच्या श्रद्धांना, विधींना, पुजांना, परंपरांना ‘अंधश्रद्ध’ म्हणणारा शहरी सुशिक्षित, सुस्थिर पांढरपेशा, मध्यमवर्ग अशा विचारांची, विवेकाची कास सोडून बाजू बदलू पाहतोय अन् सत्संगाना नि प्रवचनांना उपस्थिती लावू पाहतोय. या वर्गाने कालपर्यंत मागासलेले अंधश्रद्ध असं ज्यांचं वर्णन केलं होतं, त्यांच्या मांडीला मांडी लावून ते सश्रद्ध बनलेत. शिक्षणाचा, शहाणपणाचा, योग्य-अयोग्य ठरविण्याचा मक्ता आपल्याकडं आहे, असं मानणारा हा वर्ग पाहता पाहता नवाध्यात्मिक लाटेत सामील झालाय. हे चिंताजनक आहे. भोंदू खरातसारख्या बाबांचे स्तोम नाशिक, नगर मध्ये दिसते. याला कारण तिथली सामाजिक व्यवस्था, जातीय उतरंड अन् असमतोल सामाजिक स्थिती आहे. लोकांच्या मनात असुरक्षितता निर्माण करते. जातीय उच्चनीचतेचं समीकरण या धर्मातही अबाधित ठेवलं गेलंय. या असमतोल स्थितीमुळे अनेकांच्या मनात न्यूनत्व येतं अन् स्वतःसाठी एक सन्मानजनक स्थिती हवी असते. यातून अशा बाबांचा जन्म होतो. संतांनी आखून दिलेला मार्ग हा सन्मानानं जीवनप्रवास करण्याचे बळ देणारा आहे. या प्रवासातल्या देवांच्या दलालांची आणि धर्माच्या ‘हवाला’दारांची गरजच काय?
हरीश केंची

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia