*अर्थसंकल्पात मंजूर विकास प्रकल्पांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा*
*संपर्क तुटणाऱ्या गावातील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश*
गडचिरोली, दि. १० : पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांतील पूल प्रकल्पांच्या कामांना प्राथमिकता देवून ही कामे प्राधाण्यांने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या.
राज्य अर्थसंकल्पात गडचिरोली जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या ५८० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची सद्यस्थिती, निविदा प्रक्रिया, तांत्रिक मान्यता आणि प्रत्यक्ष कामांची पूर्वतयारी तसेच राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग व जिल्हा परिषदेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या रस्ते यांचा आढावा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी काल घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे यांनी याबाबत माहिती सादर केली.
मार्च २०२५ च्या अर्थसंकल्पातील मंजूर ५०० कोटींच्या रस्ते आणि पूल विकास योजना तसेच सुमारे ८० कोटींच्या प्रेक्षागृह, विश्रामगृह, प्रशासकीय इमारती, तसेच नियमित कामांचा यात समावेश होता. या प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पंडा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पावसाळ्यापूर्वी तातडीने अंमलबजावणी सुरू करण्याच्या सांगितले. तसेच नव्याने बांधकाम करायचे रिक्षागृह व शासकीय इमारतींसाठी चांगल्या आर्किटेक्चर कडून डिझाईन तयार करून घेण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीत सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करत विकासकामांना गती देण्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
बैठकीला राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता ऋषिकांत राउत तसेच सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषदेचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
000