
*तर्क आत्महत्या करताना…!*
~~~~~~~~~~~~~~~~~
मी गडचिरोली येथे डीडीआर म्हणून कार्यरत असताना, जिल्हा निवडणूक अधिकारी या नात्याने बाजार समिती, चामोर्शीची निवडणूक यशस्वी पार पाडल्याच्या समाधानासह परत येत होतो. ही घटना दि.18.01.2009 ची आहे. माझ्या अखत्यारीतील टाटा सुमो ने परतत असताना चामोर्शी-गडचिरोली रस्त्यावरील, सेमाना देवस्थानाच्या पुढील बायपास रोडवर, एका स्कुटीचालक कन्यकेला वाचवताना झालेल्या, टाटा सुमोच्या एका जीवघेण्या अपघाताने, मला डाव्या पायाने अंशतः व डाव्याच हाताने पूर्णतः दिव्यांग केले. माझ्यासोबत असे अनपेक्षित व अघटित घडले असले व त्यासाठी संचेती हाॅस्पिटल, पुणे येथे (तीन-चार दीर्घ शस्त्रकियांसाठी) सुमारे सहा महिन्याचा पाहुणचार (उपचार) घ्यावा लागला असला तरी त्यानंतर एका वर्षाच्या आतच Renal Cell Carcinoma नावाच्या Kidny Cancer ने माझ्याशी, आणखी नव्याने, लढण्याचे ठरविलेच.
अखेर दि.26.07.2010 ते 31.07.2010 दरम्यान यवतमाळ व नागपूर येथील अद्ययावत अशा विविध दवाखान्यांतील सर्व वैद्यकीय चाचण्यांनी माझ्या उजव्या किडनीतील Cancer ची खात्री करून दिली. शेवटी दि.12.08.2010 ला नागपूर येथील एका हाॅस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करून घेऊन माझी उजवी किडनी मला त्यागावी लागली. Cancer समूळ(?) उखडून टाकल्याचे तेथील डाॅक्टरनी सांगितले. तरी सहा महिन्यात WHOLE BODY PET SCAN करून तशी, कॅन्सर मुक्त झाल्याची, खात्री करून घेण्याचा सल्ला सुद्धा दिला. दरम्यान घरी आल्यावर, सप्टेंबर 2010 पासून मी चिखलदरा येथील एका जडीबुटी जाणणाऱ्या नाडीवैद्याकडून आयुर्वेदिक/जडीबुटीचा उपचार सुरू केला होता.
तरी नागपूर येथील डाॅक्टरने शस्त्रक्रियेनंतर दिलेल्या सल्ला-सुचने नुसार दि.29.11.2010 ला RUBY HALL Clinic, Pune येथे तसा PET Scan करण्यात आला. तेव्हा कळले/निदान झाले की, Cancer ने अजून माझ्यासोबतची दोस्ती पूर्णपणे सोडलेली नाही. आता डाॅक्टरांनी, Chemo की Radiation असा पर्याय माझ्यासमोर ठेवला. यासंदर्भात कॅन्सरतज्ज्ञ असलेल्या व स्वतः Cancer patient राहिलेल्या मुंबईच्या डाॅ.अरविंद बावडेकर यांची स्वानुभवाधारित गाथा-पुस्तक (कॅन्सर : माझा सांगाती, मौज प्रकाशन गृह, सातवी आवृत्ती -15 नोव्हेंबर 2009) माझी वाचून झाली होती. त्यानुसार अर्थातच Chemo हा पर्याय 100% नामंजूर होता. मग दीड महिने (डिसेंबर-2010 – जानेवारी-2011) Ruby Hall Clinic येथेच सलग Radiation घेतले.
Radiation च्या 3 महिन्यानंतर histopathology केली. Cancer घाबरला असावा असा डाॅक्टरनी अंदाज व्यक्त केला. दरम्यान वर नमूद केल्याप्रमाणे मी सप्टेंबर 2010 पासून आयुर्वेदीक आणि जडीबूटी ची औषध एका तज्ज्ञ नाडीवैद्याकडून नियमित घेत होतोच. शेवटी फेब्रुवारी 2011 च्या PET SCAN नंतर CANCER घाबरल्याचे डाॅक्टरना जवळजवळ पटले. आणि अजूनतरी CANCER मला घाबरून आहे.
परंतु यादरम्यान आणखी एक अघटित असे घडले की, वर नमूद Histopathology साठी उजव्या किडनीच्या अवशेषातून sample काढताना उजव्या कमरेतून पाठीमागून “सुई” टोचताना ती “अनवधानाने” माझ्या लहान आतडीला छिद्र पाडून गेली. (अशी दुर्घटना(!) म्हणे लाखात एखादीच घडते! म्हणजे मी ‘लाखात एक’ ठरलो की!) त्यातून सलग सहा महिने semiliquid fluid वहायचे. माझी श्रीमती त्याला दररोज ड्रेसिंग करून द्यायची. पण ते semiliquid fluid काही थांबेचना व त्याचे काही निदानही होईना. अखेर डाॅक्टरच्या सल्ल्यानेच ठिकठिकाणाहून केलेल्या सविस्तर अशा दीर्घ निदानानंतर लहान आतडीला छिद्र पडल्याचे कळले. व त्यासाठी एका खतरनाक अशा जीवघेण्या(!) शस्त्रक्रियेशिवाय अन्य पर्याय नाही असे मला कळविण्यात आले. असे असले तरी तोवर शस्त्रक्रियेबद्दलची माझी भिती शुन्यवत होऊन गेली होती व या शस्त्रक्रियेसाठी माझी तयारी सुद्धा होती.
परंतु अशी शस्त्रक्रिया करायला तीन-चार डाॅक्टरांनी नकार दिला, कारण की अशी शस्त्रक्रिया म्हणे खूपच रिस्की असते. अखेर यवतमाळ येथील डाॅ.अमोल देशपांडे यांनी ती रिस्क घेण्याची तयारी दर्शविली. आणि दि.08.09.2011 ला ते छिद्र बुजवण्यासाठी, संजीवन हाॅस्पिटल, यवतमाळ येथे ती जीवघेणी शस्त्रक्रिया डाॅ.अमोल देशपांडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. पण या रिस्की शस्त्रक्रियेनंतरचे 15-16 दिवस मला अन्न आणि पाण्याशिवायही फक्त सलाइन वर काढावे लागले. असा (पाण्याशिवायचा) “प्रसंग” निभावणे किती कठीण असते, हे फक्त भुक्तभोगीच जाणू शकेल. (देव असल्यास त्याला माझी विनंती की, कोणालाही अशाप्रकारे “पाण्याशिवाय” राहण्याची पाळी येऊ देवू नकोस रे बाबा! )
अशा एकूण आठ/नऊ शस्त्रक्रियांचा “अनुभव” मी घेतलाय. माझी अर्धांगिनी, सौ.उषादेवीने माझ्यावरील दृढ समर्पण भावाने केलेली अनथक सुश्रुषा, देखभाल व माझ्या कवितेच्या अदम्य बळावर मी Cancer शी यशस्वी लढत देण्यात यशस्वी झालो. पराभव स्वीकारला नाही, अजूनतरी. हा सर्व “स्वानुभव”, त्याच्या सक्षम व सुफल कारणमीमांसेसहीत कसा अभिव्यक्त करावा, याबद्दलची माझी शोधयात्रा अजूनही सूरूच आहे. स्थूल विश्वातील न्यूटनचे नियम येथे अपूरे पडतात असे वाटते. अद्यावत भौतिक शास्त्राचे, Quantam/Nuclear Physics चे काही अद्ययावत असे अनिश्चिततेचे नियमादि येथे लागू पडतील की काय, याच्या मी शोधात आहे.
देकार्त ची विखंडित विचारप्रणाली माझ्या या स्वानुभवाच्या आकलनासाठी व अभिव्यक्तीसाठी अपुरी पडत असल्याचे जाणवते. अखेर एकात्म विचारप्रणाली लाच शरण जावे लागेल असे मला वाटते. असो.
अखेर, जेथे तर्कच आत्महत्या करतो तेथून पुढचा प्रवास अनाकलनीय का असतो, याचा शोध कधीतरी लागावा अशी अपेक्षा मी बाळगून आहे.
@ॲड.लखनसिंह कटरे
बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902,
जि.गोंदिया.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~