ताज्या घडामोडी

*इतर मागासवर्ग महामंडळाच्या योजना*

गडचिरोली दि. ७ : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत ओबीसी प्रवर्गातील युवक युवतींसाठी विविध योजना उपलब्ध आहेत. या योजनेचा युवक-युवतींनी लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक‍ किशोर सातपूते यांनी केले आहे.
*योजना :-*
थेट कर्ज योजना 1 लाखापर्यंत. :
या योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.) प्रवर्गासाठी महामंडळामार्फत स्वयंरोजगाराकरीता, लघु उदयोग सुरु करण्यासाठी 1 लाखाची बिन व्याजी थेट कर्ज योजना सुरु केली आहे. सदर योजनेत नियमित परतफेड न करणा-या लाभार्थींना द.सा.द.से 4 टक्के व्याज आकारण्यात येईल.व कर्ज परतफेडीची मुदत 4 वर्ष असणार आहे.
20 % बिजभांडवल योजना 5 लाखापर्यंत.:
या योजनेंतर्गत कमाल मर्यादा रु. 5 लाखा पर्यंतचे प्रकल्पास मंजुरी देण्यात येते.‍ कृषी व संलग्न व्यवसाय, वाहतुक क्षेत्राशी संबधीत व्यवसाय तसेच पारंपारीक, लघु व सेवा उद्योगासाठी कर्ज देण्यात येते. नावीन्यपुर्ण व्यवसायासाठी कर्ज मंजुरीस प्राधान्य देण्यात येईल. मंजुर कर्ज रक्कमेच्या 5 टक्के लाभार्थी, 20 टक्के महामंडळ व 75 टक्के बँकेचा सहभाग आहे. महामंडळाच्या कर्ज रक्कमेवर 6 टक्के व्याज दर असुन बँकेच्या कर्ज रक्कमेवर बँकेचा व्याज दर लागु राहील. कर्जाची परतफेड 5 वर्षात करायची आहे.
वैय्यक्तीक कर्ज व्याज परतावा योजना 10 लाखापर्यंत.:
या योजनेचे स्वरुप बँकेने रु. 10 लाख पर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजुर केलेल्या अर्जदाराने वेळेत कर्जाचे हप्ते वेळेत भरल्यानंतर व्याजाची रक्कम (12 टक्के मर्यादेत) अर्जदाराच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. सदर योजना संपुर्णपणे संगणकीकृत आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी बँक निकषानुसार आहे.
गट कर्ज व्याज परतावा योजना 10.00 ते 50 लाखापर्यंत.:
या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महामंडळाच्या निकषानुसार विहीत केलेल्या वार्षीक उत्पन्न मर्यादेतील उमेदवाराच्या बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत), (LLP,FPO) अशा शासन प्रमाणीकरण प्राप्त संस्थाना बँके तर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरीता जे कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडुन अदा केला जाईल. या योजनेचे स्वरुप पुढील प्रमाणे आहे.नॉन क्रिमीलेअर करीता असलेल्या कौटुंबीक वार्षीक उत्पन्न मर्यादेत असलेल्या उमेदवारांच्या गटांकरीता असणार आहे. बँकेकडुन प्रत्येक गटात कमीत कमी रुपये 10 लक्ष ते जास्तीत जास्त रुपये 50 लक्षपर्यंतच्या मंजुर उद्योग उभारणी करीता आहे. मंजुर कर्जावर 5 वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जो कमी असेल ते कर्ज मंजुर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्त्ता भरल्यावर जास्तीत जास्त 12 टक्के व्याज दराच्या आणि रुपये 15 लाखाच्या मर्यादेत एकूण व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. महामंडळ केवळ बँकेने वेळेत वसुल केलेली योग्य व्याज रक्कम अदा करेल.इतर कोणतेही शुल्क, देयके अदा करणार नाही.

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना 10.00 ते 20 लाखापर्यंत.:
सदर योजना बॅकेमार्फत राबविण्यात येते.इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी / विद्यार्थीनींना उच्च शिक्षणासाठी बँकेकडून राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी रु.10.00 लक्ष व परदेशी अभ्यासक्रमासाठी रु.20.00 लक्ष इतके महत्तम कर्ज अदा करण्यात येईल. विद्यार्थीचे वय 17 ते 30 वर्षे असावे व तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराचे कौटुंबीक वार्षीक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरीता रु.8 लक्ष पर्यंत असावे. अर्जदार 12 वी 60% गुणांसह उत्तीर्ण असावा.देशांतर्गत अभ्यासक्रम 1)आरोग्य विज्ञान, 2) अभियांत्रीकी, 3) व्यावसायीक व व्यवस्थापन, 4) कृषी , अन्नप्रक्रीया व पशुविज्ञान परदेशी अभ्यासक्रम 1)आरोग्य विज्ञान, 2) अभियांत्रीकी, 3) व्यावसायीक व व्यवस्थापन, 4) विज्ञान 5) कला बॅकेने उपलब्ध करुन दिलेल्या कर्जामध्ये फक्त शैक्षणिक शुल्क पुस्तके व साहीत्य खरेदीचा समावेश राहील परदेशी अभ्यासक्रमासाठी QS च्या रॅकींग 200 च्या आतील व GRE,TOEFL परिक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.

इच्छुक उमेदवारांनी योजनेसंदर्भात www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट दयावी तसेच कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर,सामाजिक न्याय भवन,आय.टी.आय. मागे गडचिरोली येथे संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button