रस्ताच झाला बंद, आता जायचे कसे ?

गडचिरोली, ता. १७ : काळासोबत गडचिरोली शहराचाही विस्तार होत असून अनेक नव्या वसाहती निर्माण होत आहेत. अशीच एक नवी वसाहत धानोरा मार्गावरील स्कूल आॅफ स्काॅलर्स शाळेच्या मागे असून हा परीसर क्रांतिनगर नावाने ओळखला जातो. ऐन पावसाळ्यात येथे नालीच्या कलवर्टचे बांधकाम सुरू असल्याने नेहमीचा रस्ता बंद आहे. त्यामुळे येथील नागरिक एका व्यक्तीच्या खासगी जागेतून जात होते. पण तेथे मुरूम व मातीचे ढिगारे टाकल्याने हा मार्गसुद्धा बंद झाला आहे. त्यामुळे शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणी आणि नगर परीषदेअंतर्गत येणारा हा परीसर ग्रामीण भागांतील अतिदुर्गम गावांप्रमाणे संपर्कहीन झाला आहे.
मागील काही वर्षांत स्कूल आॅफ स्काॅलर्सच्या मागे असलेल्या परीसरात अनेक घरांची निर्मिती झाली असून येथे अनेक नागरिक कुटूंबासह राहत आहेत. त्यांनी ज्यांच्याकडून प्लाॅट खरेदी केला त्या ले-आऊटधारकांनी येथे वीजखांब व पधदिवे लावून दिले. पण येथे शुद्ध पेयजलासाठी नळाद्वारे पाणीपुरवठा व सिमेंट-काॅंक्रिटचा पक्का रस्ता, अशा मूलभूत सुविधांचा अभाव आहे. येथील नागरिकांना कच्च्या रस्त्याने ये-जा करावी लागते. येथे पक्का रस्ता निर्माण करण्याची मागणी अनेकदा करूनही नगर परीषद प्रशासनाने लक्ष दिले नाही. अखेर येथील नागरिकांनी एकत्र येऊन लोकवर्गणी काढत या रस्त्यावर स्वखर्चातून मुरूम टाकला. खरेतर येथे रस्त्याची नितांत गरज व मागणी असताना त्याकडे लक्ष न देता नगर परीषदेने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कुणीही मागणी केली नसताना मोठ्या नालीचे बांधकाम सुरू केले. ही नालीसुद्धा रस्ता वगळून दोन्ही बाजून बांधण्यात आली. त्यामुळे पावसळ्यात समस्या निर्माण झाली. आता येथे कलवर्ट बांधण्यात येत आहे. हे काम अर्धवट असल्याने नागरिक एका व्यक्तीच्या जागेतून कसे बसे वाहन चालवत जात होते. पण त्या व्यक्तीने जिथून वाहने जायची नमक्या त्याच ठिकाणी मुरूम,मातीचे ढिगारे टाकल्याने हा पर्यायी मार्गही बंद झाला आहे. त्यामुळे येथून मुख्य महामार्गापर्यंत जाणेच अशक्य झाले आहे. गडचिरोली नगर परीषदेची सीमा स्कूल आॅफ स्कालर्सच्या पुढे असलेल्या नाल्यापर्यंत आहे. क्रांतिनगर या नाल्याच्या अलीकडे असल्याने पालिकेअंतर्गत येते. पालिकेच्या डी.पी. प्लॅनमध्येही या परीसराचा अंतर्भाव आहे. तरीही सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
———————————————