ताज्या घडामोडी

*गडचिरोलीत ‘भगवान बिरसा कला संगम २.०’चा भव्य शुभारंभ*

*आदिवासींच्या शौर्य आणि संस्कृतीचा राष्ट्रीय गौरव; गडचिरोलीतील जनजातीय गौरव दिनाला ऐतिहासिक महत्त्व – केंद्रीय मंत्री जुएल ओराम*

*गडचिरोलीत ‘भगवान बिरसा कला संगम २.०’चा भव्य शुभारंभ; पारंपरिक लोककला आणि आधुनिक कलाविष्कारांचा अनोखा संगम*

*आदिवासी कलाकारांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच खरा जनजातीय गौरव – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके*

*४० हजार कलाकारांची नोंदणी; राज्यभरातील अडीच हजार कलाकारांना गडचिरोलीत राज्यस्तरीय व्यासपीठ*

*आदिवासी भाषा, संस्कृती आणि परंपरांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवा – अभिनेते भरत गणेशपुरे*

गडचिरोली, दि. १४ नोव्हेंबर (जिमाका) : एकेकाळी नक्षलवादाच्या प्रभावामुळे राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करणे कठीण असलेल्या गडचिरोलीत आता देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाचा सोहळा आयोजित होत आहे, ही या जिल्ह्याच्या बदलत्या परिस्थितीची आणि विकासाच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीची महत्त्वपूर्ण ओळख आहे. आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, शौर्य, त्याग आणि समृद्ध संस्कृतीला राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवून देण्यासाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे. गडचिरोलीसारख्या ऐतिहासिक आदिवासी भूमीत यंदाचा देशस्तरीय जनजातीय गौरव दिन साजरा होत आहे, ही विशेष अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन केंद्रीय जनजातीय कार्य मंत्री जुएल ओराम यांनी आज केले.

क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित ‘भगवान बिरसा कला संगम २.०’ या राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आदिवासी कलाकारांच्या सहभागामुळे गडचिरोलीत आदिवासी कला, संस्कृती आणि परंपरांचा अनोखा संगम साकारला आहे. पारंपरिक लोककला, लोकनृत्य, गायन, वाद्यवादन, हस्तकला आणि आधुनिक डिजिटल कलाविष्कारांना या महोत्सवाच्या माध्यमातून व्यापक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

*गडचिरोलीची निवड बदलत्या परिस्थितीचे प्रतीक*

केंद्रीय मंत्री जुएल ओराम म्हणाले की, गडचिरोलीची देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाच्या मुख्य सोहळ्यासाठी निवड करण्यामागे विशेष महत्त्व आहे. एकेकाळी नक्षलवादाच्या प्रभावामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन करणे आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे एकत्रित दौरे आयोजित करणे आव्हानात्मक होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली नक्षलवादाविरोधात करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे या भागातील परिस्थितीत मोठा बदल घडून आला आहे. नक्षलवादाच्या प्रभावातून बाहेर पडत गडचिरोली विकासाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करीत आहे. अशा भूमीत देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाचा सोहळा आयोजित होणे ही बदलत्या गडचिरोलीची महत्त्वपूर्ण ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासन सातत्याने प्रयत्नशील असून आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबरोबरच त्यांच्या सांस्कृतिक अस्मितेचे जतन करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. शासनाच्या विविध विकासात्मक उपक्रमांचा मोठा लाभ आदिवासी समाजाला होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

*स्वतंत्र जनजातीय कार्य मंत्रालयापासून राष्ट्रीय गौरव दिनापर्यंतचा प्रवास*

आदिवासी समाजाच्या विकासाला स्वतंत्र प्रशासकीय दिशा देण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९९ मध्ये केंद्र शासनात स्वतंत्र जनजातीय कार्य मंत्रालयाची स्थापना केली. या मंत्रालयाचा पहिला केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी आपल्याला मिळाली, असे सांगत ओराम यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या दूरदृष्टीचे स्मरण केले.

त्यानंतर २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा जनजातीय कार्य मंत्रालयाची जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळाली. या काळात आदिवासी समाजाचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, त्यांचा गौरवशाली इतिहास आणि सांस्कृतिक वारसा राष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावीपणे मांडण्याबाबत चर्चा झाली. त्यातूनच २०२१ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने भगवान बिरसा मुंडा यांची जयंती, १५ नोव्हेंबर हा दिवस ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

देशातील ७०० हून अधिक आदिवासी समुदायांच्या इतिहासाचे स्मरण व्हावे, त्यांच्या संस्कृतीचा सन्मान व्हावा आणि स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी क्रांतिवीरांच्या बलिदानाची माहिती नव्या पिढीला मिळावी, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

*क्रांतिवीर बाबूराव शेडमाके यांच्या बलिदानाचे स्मरण*

भगवान बिरसा मुंडा यांच्यासह देशाच्या विविध भागांतील असंख्य आदिवासी क्रांतिवीरांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला. गडचिरोलीच्या भूमीतील क्रांतिवीर बाबूराव शेडमाके यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढताना त्यांनी बलिदान दिले. मात्र, अशा अनेक आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास दीर्घकाळ पुरेशा प्रमाणात समाजासमोर आलेला नाही. या क्रांतिवीरांच्या त्यागाचे आणि शौर्याचे स्मरण करून त्यांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवून देणे आवश्यक असल्याचे ओराम यांनी सांगितले.

आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास जतन करण्यासाठी देशभरात संग्रहालयांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यांच्या संघर्षाशी संबंधित ऐतिहासिक दस्तऐवजांचे संकलन, जतन आणि डिजिटायझेशन करून हा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जनजातीय गौरव दिनाच्या माध्यमातून देशभरातील आदिवासी क्रांतिवीरांना अभिवादन करण्याची आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याची संधी उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

*जनजातीय गौरव दिनाला व्यापक लोकसहभागाची जोड*

जनजातीय गौरव दिनाचा राष्ट्रीय सोहळा यापूर्वी देशातील विविध भागांत आयोजित करण्यात आला असून यंदा सहाव्या जनजातीय गौरव दिनाच्या देशस्तरीय मुख्य सोहळ्याचे आयोजन गडचिरोलीत करण्यात आले आहे. या निमित्ताने आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान देशासमोर मांडण्याची संधी मिळाली आहे.

यंदा १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत देशभर जनजातीय गौरव पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आदिवासी समाजातील पद्म पुरस्कारप्राप्त व्यक्ती, अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडू तसेच पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात उल्लेख झालेल्या आदिवासी व्यक्तींच्या भेटी घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे.

मागील वर्षी देशभरात दोन लाखांहून अधिक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आणि त्यामध्ये तीन कोटी ८० लाखांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते, अशी माहिती केंद्रीय मंत्री ओराम यांनी दिली. जनजातीय गौरव दिन हा केवळ शासकीय कार्यक्रम न राहता आदिवासी समाजाच्या गौरवाची व्यापक लोकचळवळ बनावी, असे आवाहन त्यांनी केले.

गडचिरोलीतील भगवान बिरसा कला संगमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांनी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांचे अभिनंदन केले. ग्रामीण आणि दुर्गम भागातील कलाकारांना राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या कलेचा सन्मान करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.

*आदिवासी कलाकारांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच खरा जनजातीय गौरव – डॉ. अशोक उईके*

राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आपल्या मार्गदर्शनात आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन, ग्रामीण कलाकारांचा सन्मान आणि त्यांच्या कलागुणांना संधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला.

ते म्हणाले की, जनजातीय गौरव दिन म्हणजे केवळ मान्यवरांचा सत्कार किंवा औपचारिक कार्यक्रम नव्हे, तर दुर्गम भागात राहणाऱ्या सर्वसामान्य आदिवासी बांधवांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. ग्रामीण भागातील गरीब कलाकाराला राज्यस्तरीय व्यासपीठावर आपली कला सादर करण्याची संधी मिळते, त्याच्या कलागुणांचे कौतुक होते आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होतो, हाच खरा जनजातीय गौरव आहे. कलाकारांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि आनंद हाच आदिवासी विकास विभागाचा सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

*४० हजार कलाकारांची नोंदणी; अडीच हजार कलाकारांना राज्यस्तरीय संधी*

आदिवासी समाजाच्या पारंपरिक कला, लोकनृत्य, संगीत, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘भगवान बिरसा कला संगम’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमांतर्गत ९ जूनपासून राज्यभर विविध स्तरांवर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागापासून तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरापर्यंत कलाकारांना आपले कौशल्य सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.

या उपक्रमासाठी राज्यभरातून सुमारे ४० हजार कलाकारांनी नोंदणी केली. विविध स्तरांवरील स्पर्धांमधून निवड झालेल्या सुमारे अडीच हजार कलाकारांना गडचिरोलीतील राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. दुर्गम भागातील कलाकारांनी आपल्या मेहनतीच्या आणि कौशल्याच्या बळावर या व्यासपीठापर्यंत मजल मारली असून हा त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव असल्याचे डॉ. उईके यांनी सांगितले.

भगवान बिरसा कला संगमाच्या माध्यमातून कलाकारांचा आत्मविश्वास वाढविणे, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे आणि आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक परंपरांचे संवर्धन करणे हा शासनाचा उद्देश आहे. यंदा ४० हजार कलाकारांनी नोंदणी केली असून पुढील वर्षी ही संख्या ६० हजारांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

*आदिवासी संस्कृतीचे जतन ही सर्वांची सामूहिक जबाबदारी*

आदिवासी समाजाची भाषा, देव-दैवते, लोककला, परंपरा आणि सांस्कृतिक ओळख जिवंत ठेवणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील कलाकारांनी अनेक पिढ्यांपासून हा वारसा जतन केला आहे. त्यांच्या कलागुणांचा सन्मान करणे आणि त्यांना अधिक संधी उपलब्ध करून देणे ही आदिवासी विकास विभागाची जबाबदारी असल्याचे डॉ. उईके यांनी सांगितले.

क्रांतिवीर बाबूराव शेडमाके, राघोजी भांगरे, तंट्या भिल्ल यांच्यासह आदिवासी समाजातील स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्या स्मारक परिसरात स्वच्छता, दीपोत्सव आणि अभिवादनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’ साजरा करण्यात येत असून शासन, प्रशासन आणि विविध सामाजिक संस्थांच्या सहभागातून आदिवासी बांधवांना शासकीय योजनांचा लाभ देणे, त्यांच्या कार्याचा सन्मान करणे आणि सामाजिक व सांस्कृतिक सक्षमीकरणाला चालना देण्यावर भर देण्यात येत आहे.

गडचिरोलीत आलेल्या प्रत्येक कलाकाराचा आदर आणि सन्मान झाला पाहिजे. कलाकारांनी आपल्या गावात परतल्यानंतर या महोत्सवातील अनुभवातून अधिक उत्साहाने सांस्कृतिक कार्याला वाहून घ्यावे. आदिवासी समाजाच्या सर्वसामान्य घटकाचा सन्मान झाला, तरच जनजातीय गौरव दिन साजरा करण्याचा खरा उद्देश सफल होईल, असेही त्यांनी सांगितले.

*मातृभाषा आणि संस्कृतीचा वारसा पुढील पिढीला द्या – भरत गणेशपुरे*

प्रसिद्ध अभिनेते भरत गणेशपुरे यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून आदिवासी भाषा, संस्कृती आणि पारंपरिक जीवनपद्धतीच्या जतनाचे महत्त्व अधोरेखित केले.

शिक्षण, रोजगार आणि व्यवसायाच्या निमित्ताने अनेकजण गावातून शहरांकडे जातात. मात्र, शहरात स्थायिक झाल्यानंतरही आपली मातृभाषा, बोलीभाषा आणि सांस्कृतिक ओळख विसरता कामा नये. भाषा ही प्रत्येक समाजाच्या अस्मितेचा महत्त्वाचा भाग आहे. आपण आपली भाषा बोलण्याबरोबरच पुढील पिढीनेही ती आत्मसात करणे अधिक महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

आदिवासी समाजाने आपल्या परंपरा, सण-उत्सव आणि सांस्कृतिक वारशाचे अत्यंत निष्ठेने जतन केले आहे. मेळघाटातील गोंड आणि कोरकू समाजाचे उदाहरण देत त्यांनी आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक निष्ठेचे कौतुक केले. आदिवासींची हस्तकला, बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तू, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि स्थानिक उत्पादनांची ओळख व्यापक समाजाला होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

सांस्कृतिक महोत्सवांमध्ये अधिकाधिक नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढविण्यासाठी आधुनिक समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कलाकारांच्या कलाविष्कारांचे रील्स, लघुचित्रफिती आणि इतर डिजिटल माध्यमांतून प्रसारण केल्यास आदिवासी संस्कृतीची ओळख नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचू शकेल. आदिवासी कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी केंद्र व राज्य शासनाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

*पारंपरिक लोककला आणि आधुनिक डिजिटल कलाविष्कारांचा संगम*

‘भगवान बिरसा कला संगम २.०’च्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या पारंपरिक कलांबरोबरच आधुनिक डिजिटल माध्यमांतील कलाविष्कारांनाही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. लोकनृत्य, लोकसंगीत, गायन, वाद्यवादन, हस्तकला, चित्रकला, पारंपरिक पूजाविधी आणि सांस्कृतिक परंपरांबरोबरच रील्स, माहितीपट, ब्लॉग आणि लघुपट अशा आधुनिक कलाप्रकारांचा या उपक्रमात समावेश करण्यात आला आहे.

महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार, पारंपरिक कलाप्रकारांतून १ हजार १ कलाकारांची राज्यस्तरीय फेरीसाठी निवड करण्यात आली. तसेच आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे आधुनिक माध्यमांतून सादरीकरण करणाऱ्या सुमारे २५० आशयनिर्मात्यांचीही निवड करण्यात आली आहे.

आदिवासी विकास विभागाच्या विविध प्रादेशिक कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातून कलाकार या महोत्सवासाठी गडचिरोलीत दाखल झाले आहेत. पारंपरिक कलांचे दस्तऐवजीकरण करून त्यांचा वारसा भविष्यातील पिढ्यांसाठी जतन करणे, कलाकारांना प्रोत्साहन देणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीला व्यापक ओळख मिळवून देणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

*भगवान बिरसा मुंडांच्या शौर्यगाथेचे विशेष नाट्यरूप सादरीकरण*

महोत्सवात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आदिवासी कलाकारांच्या विविध सांस्कृतिक सादरीकरणांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय सायंकाळी ६ ते ८ या वेळेत भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.

भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध दिलेल्या संघर्षाचे दर्शन या नाट्यप्रयोगातून घडणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आदिवासी कलाकारांच्या कलाविष्कारांचा आनंद घ्यावा आणि त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

*उद्या देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाचा मुख्य सोहळा*

क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलात देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाचा मुख्य शासकीय सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करून देशवासीयांना मार्गदर्शन करणार आहेत.

या राष्ट्रीय सोहळ्याला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र व राज्य शासनातील विविध मान्यवरांची उपस्थिती नियोजित आहे. देशभरातील आदिवासी समाजाच्या शौर्य, संस्कृती, परंपरा आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा गौरव करणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्याचे यजमानपद गडचिरोलीला लाभले आहे. या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

*मान्यवरांची उपस्थिती*

या कार्यक्रमाला राज्यसभा सदस्य माया इवनाते, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, गडचिरोली नगरपालिकेच्या अध्यक्षा ॲड. प्रणोती निंबाळकर, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त मीना बनसोड, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त निलेश सागर, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, प्रसिद्ध अभिनेते भरत गणेशपुरे,
माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार देवराव होळी, माजी आमदार नामदेव उसेंडी, माजी आमदार कृष्णा गजबे, प्रकाश गेडाम, रमेश बारसागडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, आदिवासी समाजातील मान्यवर, कलाकार आणि नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button