ताज्या घडामोडी

*माती परीक्षणानुसारच खतांचा वापर करा; सेंद्रिय व जैविक शेतीकडे वळण्याचे कृषी विभागाचे आवाहन*

एल निनो व बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर संतुलित खत व्यवस्थापनाची गरज

गडचिरोली, (जिमाका) दि. 12 : गडचिरोली जिल्ह्यातील मृदा आरोग्याचे संवर्धन, पिकांची उत्पादकता वाढ आणि शेतीचे शाश्वत व्यवस्थापन यासाठी शेतकऱ्यांनी माती परीक्षणाच्या अहवालानुसारच रासायनिक, सेंद्रिय, जैविक तसेच पाण्यात विद्राव्य खतांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. संतुलित खत व्यवस्थापन ही काळाची गरज असून रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीच्या सुपीकतेवर विपरीत परिणाम होत असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

चालू वर्षात आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती, एल निनोचा संभाव्य प्रभाव तसेच पावसाचे असमान वितरण आणि पावसातील खंड यामुळे पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून सेंद्रिय आणि जैविक निविष्ठांचा वापर वाढविणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे. यासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन व तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देत आहे.

जिल्ह्यातील मातीच्या सद्यस्थितीनुसार बहुतांश भागातील जमीन आम्लधर्मी असून नत्राचे प्रमाण कमी, स्फुरद कमी ते मध्यम तर पालाश मध्यम ते जास्त प्रमाणात असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरताही आढळून आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी माती परीक्षण करूनच खतांचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कृषी विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, शेतकऱ्यांनी खते वापरण्यापूर्वी माती परीक्षण करून जमिनीतील नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची स्थिती तपासावी. आम्लधर्मी जमिनींच्या सुधारण्यासाठी माती परीक्षणाच्या आधारे चुनखडी किंवा डॉलोमाईटचा वापर करावा. तसेच केवळ युरियावर अवलंबून न राहता एनपीके खतांचा संतुलित वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

रासायनिक खतांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी हेक्टरी ५ ते १० टन उत्तम कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गांडूळ खताच्या वापरामुळे जमिनीत उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या वाढून मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते, असे कृषी विभागाने नमूद केले आहे.

भात शेतीसाठी ताग किंवा धैंचा यांसारख्या हिरवळीच्या खतांचा वापर फायदेशीर ठरत असून ही पिके फुलोऱ्यापूर्वी जमिनीत गाडल्यास सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. तसेच अझोटोबॅक्टर, रायझोबियम आणि पीएसबी यांसारख्या जीवाणू खतांचा वापर केल्यास रासायनिक खतांची गरज १५ ते २० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते.

भात शेतीमध्ये अझोला आणि ब्लू-ग्रीन अल्गीचा वापर विशेष लाभदायक असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. अझोलामुळे जमिनीत नत्र स्थिरावण्यास मदत होते, तर बीजीए कल्चरमुळे युरियाचा वापर २० ते २५ टक्क्यांनी कमी करता येतो.

ठिबक सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी 19:19:19, 12:61:0 आणि 13:0:45 यांसारख्या पाण्यात विद्राव्य खतांचा वापर करावा. यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होऊन पिकांना अन्नद्रव्ये थेट उपलब्ध होतात. नॅनो युरिया हा पारंपरिक युरियाला प्रभावी पर्याय असून फवारणीद्वारे दिल्या जाणाऱ्या या खतामुळे जमिनीचा पोत बिघडत नाही आणि नत्र शोषणाचे प्रमाण ८० ते ९० टक्क्यांपर्यंत वाढते, असे कृषी विभागाने सांगितले आहे.

मातीतील जस्ताच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांनी हेक्टरी २५ किलो झिंक सल्फेट जमिनीत मिसळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन, परंपरागत कृषी विकास योजना आणि विविध योजनांमधून जिल्ह्यात ७ हजार ३९४ गांडूळ खत युनिटची निर्मिती करण्यात आली असून बांधावरच्या प्रयोगशाळांमधून सेंद्रिय निविष्ठा तयार केल्या जात असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

खतांचा अवाजवी वापर टाळून स्थानिक कृषी विज्ञान केंद्र किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसारच खतांचा वापर करावा. “माती वाचवा, शेती वाचवा” हा संदेश प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रीती हिरळकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button