*Pune Purandar Airport : पुरंदरचे शेतकरी होणार कोट्यधीश! ‘पॅकेज’ ठरले, लवकरच वाटप; विमानतळासाठी शेतकऱ्यांना प्रति एकर दिड कोटी मोबदला?*
पुरंदर येथील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोबदल्याचे ‘पॅकेज’ ठरले असून, प्रति एकरी दीड कोटी रुपयांचा दर निश्चित झाला आहे. येत्या सोमवारपासून (4 मे) प्रत्यक्ष मोबदल्याचे वाटप करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. मोबदला वाटपानंतर प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रिया राबविली जाणार असल्याने पुरंदर विमानतळाच्या प्रकल्पास वेग येण्याची चिन्हे आहेत.
सहा हजार कोटींचे कर्ज
पुरंदर विमानतळाच्या तीन हजार एकर जागेसाठी दर निश्चितीबाबत उच्चाधिकार समितीची (एचपीसी) बैठक नुकतीच मुंबईत झाली. त्यात दर निश्चितीवर सरकारने शिक्कामोर्तब केले. त्यानुसार जागा, घर, झाडे, फळबागा, विहिरी यांचे दर ठरविण्यात आले असून, शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी ‘हुडको’ या वित्तीय संस्थेकडून सहा हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास राज्य सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे. या सहा हजार कोटी रुपयांपैकी सुमारे पाचशे कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झाला आहे. दर निश्चितीबाबत समजताच तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची मंगळवारी भेट घेतली.
प्रति एकरी एक कोटी 51 लाख रुपये
‘पुरंदर तालुक्यातील सात गावांतील जमिनीसाठी प्रति एकरी एक कोटी 51 लाख रुपये जागेचा दर देण्यात येणार आहे. घर, झाडे, फळबागा, विहिरी यांचा स्वतंत्र वेगळा दरही निश्चित केला आहे. चार मेपासून आम्हाला त्याचा मोबदला देण्याचे आश्वासन मिळाले आहे,’ अशी माहिती बाधित शेतकऱ्यांनी दिली. दरम्यान, पुरंदर विमानतळाच्या बाधित शेतकऱ्यांसह अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही योग्य मोबदला मिळेल. मोबदला वाटपाची प्रक्रिया जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
निर्णयांचा घटनाक्रम
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, पारगाव मेमाणे, कुंभारवळण, एखतपूर, उदाची वाडी, मुंजवडी, खानवडी या गावातील जमिनीवर विमानतळ उभारण्याचा सरकारने निर्णय घेतला.
या सात गावांतील 2 हजार 832 हेक्टर जमीन ‘औद्योगिक क्षेत्र’ म्हणून जाहीर केली केली. गेल्यावर्षी 10 मार्चला त्याची अधिसूचना काढण्यात आली.
गेल्या वर्षभरात जमीन मोजणी, शेतकऱ्यांची संमती यासारख्या प्रक्रिया राबविण्यात आल्या. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधामुळे भूसंपादनाचे क्षेत्र कमी करण्यात आले.
विमानतळ व इतर सुविधांसाठी तीन हजार एकर जागा ताब्यात घेण्याचे निश्चित झाले. त्यासाठी 3 हजार एकर जागा ताब्यात घेण्याचे निश्चित झाले. त्यासाठी 3 हजार 200 शेकऱ्यांनी जागेसाठी संमती दिल्याने विमानतळाचा मार्ग मोकळा झाला आहे.
नियोजित पुरंदर विमानतळासाठी संपादित होणारे क्षेत्र
गावांची नावे संपादित क्षेत्र (हेक्टरमध्ये)
वनपुरी १७४.०५८७
कुंभारवळण २४५.४८
उदाची वाडी ५८.३३
एखतपूर १९९.०२
मुंजवडी ८२.५५
खानवडी २६९.२२
पारगाव १८८.०६
एकूण १२१६

